मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी निर्माण करणारा अभिनेता श्रेयस तळपदे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकतंच श्रेयस तळपदेने बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनची माफी मागितली आहे. श्रेयसने क्रितीची माफी का मागितली? असा प्रश्न निर्माण होत आहे. आता यामागचे कारण समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वी श्रेयस तळपदेच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट करण्यात आले होते. या ट्वीटमध्ये त्याने क्रिती सेनॉनच्या ‘शेहजादा’ या चित्रपटाचे कौतुक केले होते. “मी नुकतंच शेहजादा पाहिला.. क्रिती तूच देशाची पुढची मधुबाला आहेस”, असे या ट्वीटमध्ये म्हटले होते. या ट्वीटमध्ये क्रितीलाही टॅग करण्यात आले होते.
आणखी वाचा : “माझे नाव आणि फोटो…” ट्विटरवरील स्वत:च्या नावाचं फेक अकाऊंट पाहून श्रेयस तळपदे संतापला
त्यावर क्रितीने प्रत्युत्तर दिले होते. “ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद”, अशी प्रतिक्रिया क्रितीने ट्वीट करत दिली होती. मात्र क्रिती सेनॉनबद्दल करण्यात आलेले हे ट्वीट श्रेयस तळपदेच्या फेक अकाऊंटवरुन करण्यात आले होते. क्रितीनेही हे अकाऊंट अधिकृत आहे की नाही, याची तपासणी न करताच त्यावर उत्तर दिले होते.

या संपूर्ण प्रकरणाची श्रेयसला माहिती मिळताच त्याने त्याच्या अधिकृत अकाऊंटवरुन ट्वीट करत क्रितीची माफी मागितली आहे. “प्रिय क्रिती, मला माफ कर. कारण तुझ्या नावे करण्यात आलेले ते ट्वीट माझ्या एका फेक अकाऊंटवरुन करण्यात आले आहे. मी याबद्दल ट्विटवर सपोर्टकडे तक्रार केली असून त्याला ब्लॉक करण्याबद्दल सांगितले आहे. त्याबरोबरच शेहजादासाठी तुम्हाला भरभरुन प्रेम आणि शुभेच्छा.”
“ट्विटर कृपया यात लक्ष घालावे ही विनंती. मी काही दिवसांपूर्वी याबद्दल तक्रार नोंदवली होती. त्यानंतर आता अवघ्या १५ दिवसात हे फेक अकाऊंट पुन्हा दिसू लागले आहे. हे निव्वळ मूर्खपणा आहे. त्याबरोबर यामुळे लोकांची दिशाभूल होत असून याची नोंद घ्यावी”, असे ट्वीट श्रेयसने केले आहे.
दरम्यान शेहजादा हा चित्रपट तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या २०२० च्या ‘आला वैकुंठपुरमुल्लो’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित धवनने केले आहे. त्याबरोबर यात कार्तिक आर्यन, क्रिती सॅनॉन, परेश रावल, मनीषा कोइरालासारखे कलाकारही यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.