अभिनेता श्रेयस तळपदे(Shreyas Talpade) हा मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमधूनदेखील प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो. कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता मात्र त्याने नुकत्याच एका मुलाखतीत अक्षय कुमारबाबत एक गोष्ट सांगितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा

श्रेयस तळपदेने नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अक्षय कुमारची एक आठवण सांगितली आहे. या मुलाखतीत त्याला विचारले की, ‘हाऊसफुल’च्या शूटिंगसाठी युरोपमध्ये जाऊन आलास. हाऊसफुलसारखा सिनेमा, एवढी सगळी कास्ट, तिथे एक वेगळीच धमाल चालू असेल, तर कसं शूटिंग झालं? यावर बोलताना श्रेयसने म्हटले, “माझं विचारशील तर आमचं ३२ दिवसांचं शेड्यूल होतं. मी १५ दिवस काम केलं. आमचे सुरुवातीचे तीन दिवस क्रूझवर जायच्या आधी आम्ही लंडनमध्ये होतो. आमची रिहर्सल होती. आम्ही रोज तास, दीड तास, दोन तास बसून रिहर्सल करायचो. वाचन करायचो. त्यानंतर आम्ही १५-१६ दिवस क्रूझवर होतो. तो अनुभव वेगळाच होता. याआधी मी गेलोय क्रूझवर, पण दोन-तीन दिवसच गेलो होतो. या शूटिंगदरम्यान खूप वेळ क्रूझवर घालवला. फ्रान्स, स्पेन, युके, स्कॉटलँड असं करत करत आम्ही नंतर एका इंग्लंडच्या गावामध्ये शूट करत होतो, त्यामुळे तो एक सुंदर अनुभव होता. सगळ्यांनी मजादेखील भरपूर केली.”

“तिथे खरंतर मला खूप फायदा झाला. अक्कीभाई म्हणजेच अक्षयकुमार जो आहे, तर तो त्याच्या फिटनेसबद्दल, त्याच्या डाएटबद्दल, आरोग्याबद्दल किती काळजी घेतो, हे सगळ्यांना माहिती आहे. पहिल्या दिवसापासून त्याने मला ताब्यात घेतलं होतं आणि माझ्या जेवणा-खाण्याच्या, व्यायामाच्या सवयी यासाठी त्याने मला रुटीन सेट करून दिलं होतं. बाकी धमाल केली, त्यापेक्षा मला हे जास्त महत्त्वाचं वाटतं. साडे सातला आम्ही नाश्ता करायचो. त्याआधी तो व्यायाम वैगेरे करून यायचा. मग , मी नंतर तासाभराने व्यायाम करायचो. तो शूटला जायचा. साडे बारा एक वाजता जेवायचो. त्याची सगळी टीम असते. त्याची शेफ वगैरे असते. तो माझ्यासाठी वेगळं जेवण तयार करून घ्यायचा. तो शूटला जायचा. मी आराम करायचो किंवा पोर्टवर वैगेरे फिरून यायचो. त्यानंतर साडे सहा वाजता जेवण तयार असायचं. त्यानंतर काही नाही, आम्ही दुसऱ्या दिवशी भेटायचो. त्यामुळे त्याने जे रूटीन सेट केलं होतं, त्याची मला खूप मदत झाली.”

हेही वाचा: Video : दिवसाला १०० सिगारेट ओढायचा शाहरुख खान! आता कायमचं सोडलं धूम्रपान पण, होतोय ‘हा’ त्रास, स्वत:च केला खुलासा

“असे काही मित्र तुमच्या आयुष्यात असतील तर त्यामुळे मोठा बदल होतो. त्याने या ३२ दिवसांत ज्याप्रकारे माझी काळजी घेतली आहे, माझ्यासाठी जे काही केले, त्यासाठी मी त्याचा कायम ऋणी राहीन. तो स्वत: माझी काळजी घेतो. एक दिवस मला साडे सातचे सात चाळीस झाले, तर त्याने दीप्तीला फोन केला आणि विचारले, तुझा नवरा कुठेय? पुढे काय बोलला ते सांगू शकत नाही. मला दीप्तीचा फोन आला, कुठे आहेस तू? तो थांबला आहे तुझ्यासाठी”, असा किस्सा श्रेयस तळपदेने सांगितला आहे.

दरम्यान, वेलकम टू द जंगल या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान श्रेयसला हार्ट अटॅक आला होता, तेव्हापासून अक्षय कुमार त्याची जास्त काळजी घेतो, असे अभिनेत्याने म्हटले आहे. अभिनेता लवकरच इमरजन्सी, वेलकम टू द जंगल, जिंदगी नमकिन अशा चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas talpade on experience of working with akshay kumar says he set my routine it helps me alot nsp