अभिनेत्री श्रुती हासन(Shruti Haasan)ने नुकतीच पिंकविलाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटावर भाष्य केले. दिग्गज अभिनेते कमल हासन व सारिका यांची ती मुलगी आहे. वडिलांप्रमाणेच तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले व स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आता अभिनेत्रीने आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर कोणत्या गोष्टींची जाणीव झाली, कोणते धडे मिळाले याबद्दल वक्तव्य केले आहे.
काय म्हणाली अभिनेत्री?
श्रुतीने म्हटले, “मी एका सुंदर कुटुंबात जन्माला आले. हुशार, कलात्मक क्षेत्रात काम करणारे पालक आणि देवाच्या कृपेने खूप सुखसोयी होत्या. पण, मी याची दुसरी बाजूदेखील बघितली आहे. जेव्हा माझे पालक वेगळे झाले, तेव्हा सगळे काही बदलले. त्यावेळी मला आर्थिक स्वातंत्र्य, एखाद्या व्यक्तीवर अवलंबून असलेले स्वातंत्र्य या गोष्टींची जाणीव झाली, त्याचे महत्त्व कळले. विशेषत: एक मुलगी म्हणून आणि आई या लग्नातून बाहेर पडली, त्यावेळी मला महिलेने स्वतंत्र असणे का महत्त्वाचे आहे याचा धडा मिळाला.”
पुढे श्रुतीने महिलांचे स्वतंत्र असण्याचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले, “पुरुषांचे स्वातंत्र्य मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते, हे आपण नेहमी पाहतो. मला हे सांगायला आवडेल की, आपण स्वतंत्र फेमिनिस्ट आहोत, हे घोषित करायची गरज नाही. आपल्याला हे दररोज करायचे नाही. ही अतिशय शांतपणे लढली जाणारी लढाई आहे. अनेक स्त्रियांना हे पटेल की कोणीही आपले कौतुक करत नाही, ते आपण स्वत:च करू शकतो.”
कमल हासन व सारिका यांच्या घटस्फोटाबद्दल बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “त्यांचा घटस्फोट आमच्यासाठी वेदनादायी होता. पालकांचा घटस्फोट होणे हे मुलांसाठी तसेच पालकांसाठी दु:खदायक आहे. आज अनेक घरांत हे सामान्य झाले आहे. आई-वडील वेगळे होतानाच वेदना होतात असे नाही. अशी अनेक घरे आहेत, जिथे समाजासाठी पालक एकत्र राहतात. कधीकधी त्या घरांमध्ये जास्त त्रास होतो, कारण त्या वेदना उघड केल्या जाऊ शकत नाही.”
आई-वडिलांबद्दल बोलताना श्रुती हासनने म्हटले, “जेव्हा ते एकत्र होते आणि आनंदात होते, त्यावेळी मी आतापर्यंत पाहिलेले ते सगळ्यात सुंदर जोडपे होते. कारण ते एकत्र काम करायचे, एकत्र सेटवर जायचे. माझं संपूर्ण कुटुंब चित्रपटसृष्टीत काम करत होतं. माझी बहीणसुद्धा असिस्टंट डायरेक्टर विभागात होती.”
पुढे श्रुतीने असेही म्हटले, “जेव्हा त्यांना वाटले की ते एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत, त्यावेळी ते एकमेकांशी बोलले आणि निर्णय घेतला. त्यांनी एकत्र राहण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते राहू शकले नाहीत. स्वतंत्रपणे ते दोघेही प्रतिभावान व्यक्ती आहेत. ते आजही माझे पालक आहेत, याचा मला आनंद आहे. जर ते वेगळे होऊन आनंदी राहू शकत असतील, तर ते आमच्यासाठीसुद्धा चांगले आहे”, असे म्हणत श्रुतीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.