बिग बजेट ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटाची सध्या प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर व जान्हवी कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘देवरा: पार्ट १’ चित्रपट २७ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जान्हवी कपूर दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहेत. या चित्रपटाच्या टीझर, ट्रेलर व गाण्यांनी प्रेक्षकांची अधिक उत्सुकता वाढवली आहे. अशा या ३०० कोटींचं बजेट असलेल्या ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटात एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री झळकणार आहे. नुकतंच या मराठी अभिनेत्रीने चित्रपटाच्या डबिंगचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
कोराताला शिवा लिखित, दिग्दर्शित ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटात झळकणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने याआधी बॉलीवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. मराठी, तमिळ, कन्नड आणि हिंदी या चारही भाषेत तिनं काम केलं आहे. आता ती अभिनयाबरोबर निर्मिती क्षेत्रातही दमदार काम करत आहे. आतापर्यंत ओळखलंच असेल ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटात कोणती मराठी अभिनेत्री पाहायला मिळणार आहे. ‘नवा गडी नवं राज्य’ आणि ‘भूमिकन्या’ मालिकेची निर्माती म्हणजे अभिनेत्री श्रुती मराठी ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर, सैफी अली खान यांच्यासह दिसणार आहे.
अभिनेत्री श्रुती मराठीने नुकतेच ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटाच्या डबिंगचे फोटो शेअर केले आहेत. श्रुतीची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “टॉलिवूडमध्ये स्वागत आहे”, “सुपर मॅडम’, “तुम्ही पॅन इंडियन अभिनेत्री व्हावे ही शुभेच्छा”, “आतुरता”, “अभिनंदन”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा – “विजेता आधीच ठरलेला असतो”, ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातील स्पर्धकाचे वक्तव्य, म्हणाला…
दरम्यान, श्रुती मराठेचा ‘गुलाबी’ नावाचा मराठी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित ‘गुलाबी’ चित्रपटात श्रुतीसह अभिनेत्री अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.