लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाची अजूनही बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरू आहे. १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बक्कळ कमाई करत बरेच रेकॉर्ड मोडले आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘छावा’ चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना शंभूराजेंची पत्नी महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत झळकली आहे. या चित्रपटात बऱ्याच मराठी कलाकारांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. अभिनेता संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, आस्ताद काळे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये पाहायला मिळत आहे. नुकतंच सुव्रत जोशीची सासूबाई अभिनेत्री शुभांगी गोखलेंनी ( Shubhangi Gokhale ) त्याचं ‘छावा’ चित्रपटातील कामाचं कौतुक केलं.

विकी कौशल व रश्मिका मंदाना यांच्या ‘छावा’ चित्रपटात अभिनेता सुव्रत जोशीने कान्होजी शिर्केंची भूमिका साकारली आहे. तसंच सुव्रतबरोबर सारंग साठ्ये गणोजी शिर्केंच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. ‘छावा’ चित्रपटातील सुव्रत आणि सारंगच्या कामाचं इतर कलाकारांनी कौतुक केलं आहे. त्यानंतर आता पहिल्यांदाच शुभांगी गोखले ( Shubhangi Gokhale ) ‘छावा’ चित्रपटाबाबत बोलल्या आणि त्यांनी जावई सुव्रत जोशीच्या कामाचं कौतुक केलं.

‘टेली गप्पा’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना शुभांगी गोखले ( Shubhangi Gokhale ) यांनी ‘छावा’ चित्रपटातील सुव्रतच्या कामाबद्दल विचारलं. तेव्हा शुभांगी गोखले म्हणाल्या, “अरे खूप अभिमान वाटतो. सुव्रत एक उत्तम नट आहेच. तो अजून मोठ्या प्लॅटफॉर्मवर झळकणार आणि अजून कळणार. त्याची ‘छावा’ चित्रपटात नकारात्मक भूमिका आहे. सारंग आणि त्याला बघून लोकांना खूप राग येतो, चीड येते. हेच यश आहे आणि दोघांनी ते करण खूप महत्त्वाचं होतं. तसंच ‘छावा’ चित्रपट सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे.”

दरम्यान, शुभांगी गोखलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेबरोबर विविध नाटक, चित्रपटात काम करत आहेत. सध्या त्यांचं रंगभूमीवर ‘असेन मी नसेन मी’ हे नाटक जोरदार सुरू आहे. अमृता सुभाष दिग्दर्शित या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘असेन मी नसेन मी’ नाटकात शुभांगी गोखले ( Shubhangi Gokhale ) यांच्याबरोबर नीना कुळकर्णी, अमृता सुभाष महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या नाटकातील तिघींच्या कामाचं प्रेक्षकांकडून नेहमी भरभरून कौतुक होतं असतं.