अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. २३ वर्षांची अवनीत स्पष्टवक्ती आहे. बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अवनीतने एका मुलाखतीत तिला आलेले वाईट अनुभव सांगितले आहेत. एका मुलाने तिच्याबरोबर गैरवर्तन केलं होतं, असं अवनीत म्हणाली.
हॉटरफ्लायशी बोलताना अवनीतने लहानपणी होळीमध्ये तिच्याबरोबर घडलेली एक धक्कादायक घटना सांगितली. “होळीच्या वेळी मी एका मुलाला नाही म्हणूनही त्याने माझ्या नितंबांवर पाण्याचा फुगा फेकला होता. त्यानंतर मला राग आला आणि मी म्हटलं, ‘बेटा, आता तू बघच. मी कशी मुलगी आहे हे तुला माहीत नसेल. रागात बॅट हातात घेतली आणि मी त्या मुलाला पकडून मारलं,” असं अवनीत म्हणाली.
अवनीतने पुढे सांगितलं की, त्या मुलाला बॅटने मारहाण केल्यानंतर त्याची आई तिच्या आईकडे तक्रार करण्यासाठी आली होती. अवनीत म्हणाली, “त्या मुलाची आई माझ्या आईकडे तक्रार करत आली की म्हणाली तुमच्या मुलीने माझ्या मुलाला मारलं. माझी आई म्हणाली, ‘होय, कारण त्याने मार खाण्यासारखंच काम केलं होतं.'”
जाहिरातीवरून शाळेत चिडवलं जायचं
अवनीत कौरने एका प्रसिद्ध साबणीच्या जाहिरातीत काम केलं होतं. त्या जाहिरातीमुळे शाळेत तिला चिडवलं जायचं, तिची खिल्ली उडवली जायची. “जेव्हा मी शाळेच्या कॉरिडॉरमधून जायचे, तेव्हा मुलं मला त्या जाहिरातीचा उल्लेख करून चिडवायचे. या गोष्टीचा मनावर फार परिणाम झाला आणि त्यामुळे लोकांशी संवाद साधणं टाळू लागले,” असं अवनीतने नमूद केलं. “मी स्टार असल्यामुळे मी अशी वागते, असं लोक म्हणत होते. पण मी अशीच आहे हे लोकांना कसं सांगावं,” असं अवनीत म्हणाली.
अवनीत कौर शुबमन गिलमुळे चर्चेत
दरम्यान, २३ वर्षांची अवनीत व क्रिकेटपटू शुबमन गिल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासू होत आहेत. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या काही दिवसाआधी अवनीतने दुबईतील स्टेडियममधील काही फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे तिच्या व शुबमनच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. अवनीतने शुबमनच्या वाढदिवसाला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्यानंतर तिने दुबईतील फोटो शेअर केले, त्यामुळे अवनीत व शुबमन एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. पण या दोघांनीही याबद्दल अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.