‘गल्ली बॉय’फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी चित्रपटातील ‘शेर आया’ या गाण्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. नंतर दीपिका पदुकोण, अनन्या पांडे अशी स्टारकास्ट असलेल्या ‘गहराइयां’ या चित्रपटामध्ये तो प्रमुख भूमिकेत दिसला. परंतु, आलिया भट्ट, रणबीर कपूर अभिनीत ‘ब्रह्मास्त्र : भाग १- शिवा’ चित्रपट नाकारल्याने सिद्धांतला टीकेचा सामना करावा लागला होता. त्याबद्दलचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला आहे.
अलीकडेच ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत, सिद्धांत म्हणाला, “गल्ली बॉय या चित्रपटाच्या एक महिन्यापूर्वी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची कास्टिंग सुरू झाली होती. या चित्रपटातील निर्मात्यांनी मला ऑफर दिली होती. चित्रपटामधील पात्रांपैकी एका पात्रासाठी कास्टिंग दिग्दर्शकातर्फे मला ही ऑफर मिळाली होती. पण समस्या अशी होती की, त्याची स्क्रिप्ट तयार नव्हती. त्यांनी मला सांगितले की, हा एक अॅक्शन फॅन्टसी चित्रपट आहे आणि यात तू मार्शल आर्ट्स करशील. आश्रमातील एका सुपरहीरोची भूमिका मला मिळाली होती. म्हणून ते मला म्हणाले की, तू हे करायला हवं आणि हा व्हीएफएक्सवर आधारित प्रोजेक्ट असल्याने याला पूर्ण व्हायला पाच वर्षे जातील.”
सिद्धांत पुढे म्हणाला, “त्यानंतर मी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला भेटलो. त्यांचं प्रॉडक्शन हाऊस खूप मोठं आहे आणि या चित्रपटाचे तीन भाग येणार असल्याने ही चांगली संधी होती. मी अयान मुखर्जी यांना म्हणालो की, मला स्क्रिप्ट द्या म्हणजे या पात्राबद्दल मला आणखी माहिती मिळेल; परंतु त्यांच्याकडे स्क्रिप्ट नव्हती आणि त्यावेळी त्या चित्रपटाची नुकतीच सुरुवात झाली होती. चित्रपटाचे तीन भाग होणार होते आणि काय निर्णय घ्यावा याबद्दल मी विचार करीत होतो.”
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी ‘बंटी और बबली २’, ‘गहराइयां’ व ‘फोन भूत’सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या सिद्धांतला ‘ब्रह्मास्त्र’मधील भूमिका नाकारल्याबद्दल गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले.
चित्रपट नाकारल्याचं सांगत सिद्धांत म्हणाला, “मी कास्टिंग दिग्दर्शकाला सांगितले की, मी हा चित्रपट करू शकणार नाही. तो पटकन उठला आणि मला म्हणाला, “वेडा आहेस का?, धर्मा प्रॉडक्शन्सबरोबर तीन चित्रपटांचा हा करार आहे.” तेव्हा मी म्हणालो, “जर अमिताभ बच्चन, रणबीर कपूर व आलिया भट्ट यांच्यासारखे कलाकार या चित्रपटात असतील, तर मला कोण कशाला बघेल? जर तुम्ही मला दोन ओळींचा संवाद दिला असता, तर माझ्या पात्राबद्दल मला थोडीतरी कल्पना आली असती.”
“तेव्हा मला कास्टिंग टीमकडून ब्लॅकलिस्ट केलं गेलं. मी कास्टिंग सर्किटमध्ये बदनाम झालो होतो. वेडा आहे हा मुलगा, सिलेक्ट होऊनही नंतर चित्रपट नाकारतो, असं माझ्याबद्दल म्हटलं जायचं. सुदैवानं हा चित्रपट तयार व्हायला खूप वेळ लागला. तोपर्यंत ‘गल्ली बॉय’ चित्रपट मला मिळाला होता. मला वाटतं ‘ब्रह्मास्त्र’मधील ते पात्र त्यांनी काढून टाकलं. एक प्रकारे जे काही घडलं, ते चांगल्यासाठीच घडलं.” असे सिद्धांतने नमूद केले.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाला सिद्धांत चतुर्वेदी डेट करीत असल्याची चर्चा आहे. अनेकदा ते एकत्र फिरताना दिसले आहेत. सिद्धांतच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, २०२३ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘खो गये हम कहां’ चित्रपटात सिद्धांत अनन्या पांडेबरोबर दिसला होता. आता सिद्धांतचा ‘युद्ध्रा’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मालविका मोहनम नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.