बॉलीवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने ‘गली बॉय’ चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ११ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गहराइयां’ चित्रपटामुळे सिद्धांत चर्चेत आला. बॉलीवूडमधील स्ट्रगल कोणालाच सुटत नाही, असं म्हणतात. सिद्धांतलाही बॉलीवूडमधील आव्हानांना सामोरं जावं लागलं होतं. या कठीण काळात सिद्धांतला काही कलाकारांकडून पाठिंबाही मिळाला होता. अलीकडेच याबाबत त्यानं खुलासा केला आहे.
‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धांत म्हणाला, “मी इंडस्ट्रीमधील कोणत्याही व्यक्तीकडून अपेक्षा ठेवत नाही. चांगलं काम केल्यावर मिळत असलेल्या पाठिंब्याचं मी कौतुक करतो परंतु कठीण काळात इंडस्ट्रीमधलं कोणीही जवळ नसल्याची खंत मला वाटते.”
हेही वाचा… पूजा सावंतच्या लग्नात सुखदा खांडकेकरच्या नखांची चर्चा; अभिनेत्रीकडून फोटो शेअर; म्हणाली, “आज या…”
कलाकारांच्या पाठिंब्याबद्दल बोलताना, सिद्धांत म्हणाला, “विकी कौशल आणि रणबीर कपूरने मला खूप मदत केली आहे. रणबीर कपूर आणि मी फोनवर खूप वेळा बोललोसुद्धा आहे.”
पुढे सिद्धांत म्हणाला, “मी रणबीरला म्हणालो होतो, “मला माहीत नाही भाई; पण मी केलेलं काम चालतच नाही आहे.” त्यावर रणबीर म्हणाला होता, “तू काम करत राहा. इतर लोक १०० गोष्टी करीत आहेत याचा विचार तू करू नकोस.” आणि असाच रणबीर आहे. असं मला वाटतं. शंभर ठिकाणी नसूनही तो प्रसिद्ध आहे. ‘गहराइयां’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर रणबीर आणि आलिया हे दोघंच असे होते: ज्यांनी मला मोठमोठे मेसेज केले होते.”
हेही वाचा… आमिर खानने ‘असा’ घेतला होता दुसऱ्या पत्नीशी घटस्फोट; किरण राव म्हणाली, “आम्हाला आझादला…”
“रणबीर म्हणाला होता, “जेव्हा तू चित्रपट चालण्याची अपेक्षा सोडशील तेव्हा तुझा चित्रपट चालेल.” ‘खो गये हम कहां’ हा चित्रपट फक्त नेमक्या प्रेक्षकांसाठी बनवला गेला होता. पण त्याला लोक एवढं प्रेम देतील, असं मला वाटलं नव्हत”, असंही सिद्धांतनं नमूद केलं.
दरम्यान, सिद्धांतच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर २०२३ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘खो गये हम कहां’ चित्रपटात सिद्धांतबरोबर अनन्या पांडे आणि आदर्श गौरवनं मुख्य भूमिका केल्या होत्या. ‘गली बॉय’ चित्रपटामुळे सिद्धांत घराघरांत पोहोचला. सिद्धांतचा आगामी चित्रपट ‘युद्ध्रा’ लवकरच प्रदर्शित होणार असून, त्यात मालविका मोहनम नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.