सिद्धार्थ मल्होत्रा, अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह यांचा ‘थॅंक गॉड’ हा चित्रपट येत्या दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इंद्र कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सिद्धार्थ सध्या या चित्रपटाचे प्रमोशन करण्यामध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलरमध्ये दाखवलेल्या काही दृश्यांमुळे हा चित्रपट बॉयकॉट केला जावा अशी मागणी नेटीझन्स करत होते.
‘थॅंक गॉड’ हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अक्षय कुमारचा ‘रामसेतु’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने अक्षय कुमार आणि अजय देवगन आमने-सामने येणार आहेत. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये याविषयावर मत मांडले. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला, “‘थॅंक गॉड’ हा विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचताना मी खूप हसलो. मी इंद्र कुमार यांचे चित्रपट पाहिले आहेत. त्यांच्यासह काम करताना फार मजा आली. विनोदी चित्रपटांमध्ये काम करणे मला आवडत असले, तरी मी या धाटणीचा चित्रपट याआधी केला नव्हता. प्रेक्षक यंदाच्या दिवाळीला हा चित्रपट नक्की पाहतील अशी मी आशा करतो”
तो पुढे म्हणाला, “अनेक वर्षांपासून दिवाळीला एकाच वेळी बरेचसे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या कालावधीमध्ये लोक एकत्र येऊन दिवाळी साजरी करत असतात; आपल्या कुटुंबियासह, मित्रांसह सर्वजण चित्रपट पाहायला जातात. त्यामुळे याचा कोणत्याही चित्रपटावर फारसा परिणाम होईल असे मला वाटत नाही. आता सर्वकाही प्रेक्षकांवर अवलंबून आहे. अक्षय आणि त्यांच्या संपूर्ण ‘रामसेतु’ चित्रपटाच्या टीमला मी शुभेच्छा देतो”
या चित्रपटामध्ये अजयने चित्रगुप्त यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाद्वारे चित्रगुप्त आणि हिंदू देव-देवतांची खिल्ली उडवली जात आहे असे म्हणत लोक चित्रपटाला विरोध करत होते. ‘थॅंक गॉड’मध्ये सिद्धार्थने अयान कपूर ही भूमिका साकारली आहे. याच वर्षी त्याचा ‘योद्धा’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे.