Sidharth Malhotra Video Viral: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने पहलगाम येथे हल्ला झाल्यानंतर नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. निष्पाप लोकांवर केलेला हा भ्याड हल्ला असल्याचे त्याने म्हटले. अभिनेत्याने या हल्ल्याचा निषेध केला. आता अभिनेता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी काही दिवसांपूर्वी ते आई-बाबा होणार असल्याचे घोषित केले. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट शेअर करीत ही माहिती चाहत्यांना दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर चाहत्यांसह बॉलीवूडमधील कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. सिद्धार्थ व कियारा हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडपे आहे. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. अनेकदा पापाराझीदेखील त्यांचे विविध ठिकाणचे फोटो काढताना दिसतात. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.
सिद्धार्थ मल्होत्रा भडकला
आता सिद्धार्थ व कियाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा भडकला असल्याचे पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये कियारा तिच्या गाडीमध्ये बसली आहे. पापाराझी तिचे फोटो काढण्याचे प्रयत्न करत आहेत. कियाराने तिचा चेहरा हाताना झाकल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तितक्यात सिद्धार्थ येतो. त्याला संताप अनावर झाल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले. त्याने पापाराझींना मागे जाण्यास सांगितले. तसेच नीट वागा असेही तो बजावताना दिसत आहे.
या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी सिद्धार्थने जे केले, ते बरोबर केले असे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “सिद्धार्थचे वागणे १०० टक्के बरोबर आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “त्याने त्याच्या पत्नीचे संरक्षण केले, बरोबर केले”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “त्यांना थोडा खासगीपणा द्या”, अशा अनेक कमेंट करत चाहत्यांनी सिद्धार्थ मल्होत्राला पाठिंबा दिला आहे.


सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली. आता ते लवकरत आई-वडील होणार आहेत. सिद्धार्थने वरुण धवन व आलिया भट्ट यांच्याबरोबर स्टुंडट ऑफ द इअर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने एक व्हिलन, बार बार देखो, शेरशाह, योद्धा अशा चित्रपटांत काम करत अभिनयाची छाप उमटवली.
कियारा अडवाणीने गेम चेंजर, एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी, कबीर सिंग, शेरशाह, भुल भूलैय्या २ अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे. आगामी काळात हे कलाकार कोणत्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.