सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘योद्धा’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. १५ मार्च २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थने अलीकडेच राशी खन्ना आणि दिशा पाटनी यांच्याबरोबर चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमासाठी भारताची राजधानी नवी दिल्लीला भेट दिली. ‘शेरशाह’, ‘इंडियन पोलीस फोर्स’ आणि आता ‘योद्धा’ चित्रपटात सिद्धार्थ गणवेशात दिसणार आहे. एका पाठोपाठ एक गणवेशातील चित्रपट करण्यामगचं कारण त्याला पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना सिद्धार्थ म्हणाला, “मला वाटते की एका पाठोपाठ एक देशभक्तीपर चित्रपटांची निवड करणे हे फक्त योगायोगाने घडले आहे. माझे कदाचित गणवेशाकडे थोडे अधिक आकर्षण आहे, देशात कोणत्याही प्रकारच्या सेवा का असेना माणूस गणवेशापेक्षा दुसऱ्या कोणत्याही कपड्यात जास्त शोभून दिसत नाही. पण चित्रपटातला गणवेश हा एक काल्पनिक असतो. मी आधी लष्करी अधिकाऱ्याच्या गणवेशात दिसलो, नंतर पोलिसांच्या गणवेशात दिसलो आणि आता पुन्हा एकदा या चित्रपटातही मी गणवेशात दिसणार आहे.”

सिद्धार्थ असंही म्हणाला की, “या चित्रपटाचा विषय गंभीर जरी असला तरीही यात रोमान्स आहे. जर तुम्ही ट्रेलर पाहिला असेल तर ‘योद्धा’मध्ये लव्हस्टोरीदेखील दाखवली आहे. आपण इथे धर्मा प्रोडक्शन चित्रपटाचं प्रमोशन करतोय तर कदाचित तुम्ही करण जोहरला विचारू शकता की तो माझ्यासाठी त्याचा पुढचा रोमँटिक चित्रपट कधी बनवणार आहे.”

हेही वाचा… “माझ्या मुलांनी पळून जाऊन…” अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्याबद्दल ट्विंकल खन्नाने केलं भाष्य

दरम्यान, ‘योद्धा’ चित्रपटाबद्दल सांगायचं झाल्यास, १५ मार्च २०२४ रोजी ‘योद्धा’चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच सिद्धार्थ मल्होत्रा, राशी खन्ना आणि दिशा पाटनी एकत्र दिसणार आहेत. सागर आंब्रे लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थने पुन्हा एकदा लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sidharth malhotra on choosing uniform and patriotic films like yodha indian police force shershaah dvr