Sikandar Box Office 6 Day Collection: सध्या सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाची खूप चर्चा रंगली आहे आणि चर्चेच कारण आहे प्रेक्षकांचा प्रतिसाद. ‘सिकंदर’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. सलमान खानचा हा चित्रपट प्रदर्शित होताच चार दिवसांत १०० कोटींचा आकडा पार करेल किंवा २०२५मधील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरले. पण, ‘सिकंदर’ प्रदर्शित झाल्यानंतरचं चित्र काहीस वेळ दिसत आहे. ‘सिकंदर’ चित्रपटाला पाहिजे तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाहीये. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटासारखी बक्कळ कमाई ‘सिकंदर’ला करताना नाकीनऊ झाल्याचं दिसत आहे.

ए.आर. मुरुगादॉस यांनी दिग्दर्शित केलेला ‘सिकंदर’ चित्रपट ३० मार्चला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. २०० कोटींचं बजेट असलेला हा चित्रपट पहिल्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर पाहिजे तशी कमाई करू शकला नाही. खूप मेहनतीने पहिल्या दिवशी ‘सिकंदर’ फक्त २६ कोटींची कमाई करू शकला. त्यानंतर कमाईत किंचित वाढ झाली. पण, पुढे मोठ्या प्रमाणात उतरती कळा पाहायला मिळाली.

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या कमाईत गुरुवारच्या तुलनेत सहाव्या दिवशी शुक्रवारी दुप्पट घट झाल्याचं दिसत आहे. गुरुवारी ‘सिकंदर’ चित्रपटाने ६ कोटींची कमाई केली होती. पण शुक्रवारी ‘सिकंदर’ फक्त ३.७५ कोटींचा गल्ला जमवू शकला. जर विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाचं बोलायचं झालं तर, सहाव्या दिवशी या चित्रपटाने ३२ कोटींची कमाई केली होती आणि सहा दिवसांमध्ये एकूण कमाईचा आकडा १९७.७५ कोटी रुपये होता.

जागतिक स्तरावर सलमान खानच्या चित्रपटाने जवळपास एकूण १५५ कोटींची कमाई केली आहे. परदेशात दिवसाला ४३ कोटींच्या आसपास कमाई करताना दिसत आहे. भारतात ५ दिवसांत ‘सिकंदर’ चित्रपटाने १०७.२५ कोटींची केली आहे. दरम्यान, ‘सिकंदर’ चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त रश्मिका मंदाना, काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. तसंच ‘बाहुबली‘ चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायिकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.