Sikandar Box Office Collection Day 3 : सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सिकंदर’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चा आहे. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर पहिल्या दोन दिवसांत म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. आता नुकतीच ‘सिकंदर’च्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी सुद्धा समोर आलेली आहे. या सिनेमाने तीन दिवसांमध्ये एकूण कलेक्शन किती केलं जाणून घेऊयात…
सलमान खानच्या ‘सिकंदर’ने ३० मार्चला म्हणजेच ओपनिंग डेला एकूण २६ कोटी कमावले. याशिवाय सलमानचा सिनेमा मंडे टेस्टमध्येही पास झाला. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने एकूण २९ कोटींची कमाई केली. मात्र, मंगळवारी ( १ एप्रिल ) तिसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत तब्बल ३२.७६ टक्क्यांनी घट झाली आहे. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार, भाईजानच्या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी फक्त १९.५ कोटींचा गल्ला जमावला आहे.
यामुळे ‘सिकंदर’चं पहिल्या ३ दिवसांचं कलेक्शन ७४.५ कोटी एवढं झालं आहे. सिनेमाने आतापर्यंत आपलं मूळ बजेट देखील वसूल केलेलं नाही. याशिवाय सलमानच्या सिनेमावर विकी कौशलचा ‘छावा’ वरचढ ठरला आहे. कारण, विकीच्या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत कमीत कमी स्क्रीन असून देखील बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व कमाई केली होती. त्यामुळे सलमानची जादू बॉक्स ऑफिसवर अजिबात चालली नाही अशा चर्चा रंगल्या आहेत. याशिवाय सिनेमाची पटकथा, एडिटिंग, दिग्दर्शन यावर नेटकऱ्यांनी एक्स पोस्ट शेअर करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सलमान खानचा ‘सिकंदर’ २०० कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. ३ दिवसांत सिनेमाने फक्त ७४.५ कोटी कमावल्याने अजून मूळ बजेट वसूल करण्यापासून हा सिनेमा खूप दूर आहे. तर, सलमानने या सिनेमासाठी तब्बल १२० कोटी मानधन घेतल्याचं वृत्त ‘फिल्मीबीट’ने दिलं आहे. तर, रश्मिका मंदानाला या सिनेमासाठी ५ कोटींचं मानधन देण्यात आलं आहे.
सलमान खानच्या सिकंदरमध्ये सलमान खान, रश्मिकासह दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर, सत्यराज, शर्मन जोशी, काजल अग्रवाल, किशोर, संजय कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकले आहेत. तर, सिनेमाचं दिग्दर्शन ए. आर. मुरुगादोस यांनी केलं आहे.