Salman Khan Sikandar Movie Collection Day 4 : सलमान खानच्या ‘सिकंदर’ सिनेमाकडून त्याच्या चाहत्यांसह चित्रपट समीक्षकांना देखील भरपूर अपेक्षा होत्या. या सिनेमातून भाईजानने बॉक्स ऑफिसवर दीड वर्षांनी पुनरागमन केलं आहे. त्यामुळे ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’ या सिनेमांप्रमाणे ‘सिकंदर’ पाहण्यासाठी सुद्धा प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, ‘सिकंदर’च्या पदरी पहिल्या दिवसापासून निराशा आली आहे.
‘सिकंदर’ पहिल्याच दिवशी ग्रँड ओपनिंग करेल असा विश्वास स्वत: सलमानला देखील होता. मात्र, या सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ २६ कोटींची कमाई केली. याउलट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाने कमी शो मिळूनही बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी तब्बल ३३.१ कोटींचा गल्ला जमावला होता. ‘सिकंदर’ला त्या तुलनेत संपूर्ण देशभरात शोज देखील जास्त मिळाले होते.
दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी ‘सिकंदर’ने अनुक्रमे २९ व १९.५ कोटींची कमाई केली. ‘सिकंदर’च्या तिसऱ्या दिवशीच्या कमाईत तब्बल ३२ टक्क्यांची घट पाहायला मिळाली होती. त्यामुळे चौथ्या दिवशी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.
‘सिकंदर’ सिनेमाच्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घट
सलमान खानच्या ‘सिकंदर’ला चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १० कोटी देखील कमावता आलेले नाहीत. या चित्रपटाने चौथ्या दिवशी फक्त ९.७५ कोटींचा गल्ला जमावला असल्याचं वृत्त ‘सॅकनिल्क’ने दिलेलं आहे. कलेक्शनची एवढी कमी आकडेवारी ऐकून भाईजानच्या सगळ्याच चाहत्यांना धक्का बसला आहे. सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये चौथ्या दिवशी तब्बल ५० टक्क्यांनी घट झाली आहे.
आतापर्यंत म्हणजे प्रदर्शित झाल्यापासून गेल्या ४ दिवसांमध्ये ‘सिकंदर’ने ८४.२५ कोटींचा गल्ला जमावला आहे. सिनेमाला अद्याप आपलं मूळ बजेट अर्धही वसूल करता आलेलं नाही. ‘सिकंदर’चं मूळ बजेट २०० कोटी आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता सलमानच्या सिनेमाला १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेताना देखील मोठी कसरत करावी लागणार आहे.
दरम्यान, ‘सिकंदर’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये सलमान खान व रश्मिका मंदाना यांच्यासह शर्मन जोशी, प्रतिक बब्बर, काजल अग्रवाल, सत्यराज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन ए. आर. मुरुगादोस यांनी केलं आहे.