Sikandar Box Office Collection Day 9 : सलमान खानच्या ‘सिकंदर’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालेलं नाही. ‘सिकंदर’ प्रदर्शित होऊन तब्बल ९ दिवस उलटून गेलेत तरीही, अद्याप सिनेमाचं मूळ बजेट सुद्धा वसूल झालेलं नाही. इतकंच काय सलमान खानने घेतलेलं मानधन सुद्धा आतापर्यंतच्या कलेक्शनपेक्षा जास्त आहे. त्यामुळे भाईजानच्या सिनेमावर फ्लॉपची पाटी बसली आहे.

‘सिकंदर’च्या निमित्ताने सलमान खान दीड वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार होता. त्यामुळे या सिनेमाकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, याउलट परिस्थिती बॉक्स ऑफिसवर निर्माण झालेली आहे. चित्रपटाचं कथानक, एडिटिंग, स्टारकास्ट, दिग्दर्शन या कोणत्याच गोष्टी चित्रपट समीक्षकांना देखील रुचलेल्या नाहीत. परिणामी, सलमान खानच्या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

सलमान खानच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन…

  • पहिला दिवस ( रविवार ३० मार्च ) – २६ कोटी
  • दुसरा दिवस – २९ कोटी
  • तिसरा दिवस – १९.५ कोटी
  • चौथा दिवस – ९.७५ कोटी
  • पाचवा दिवस – ६ कोटी
  • सहावा दिवस – ३.५ कोटी
  • सातवा दिवस – ४ कोटी
  • आठवा दिवस – ४.७५ कोटी
  • नववा दिवस ( सोमवार ७ एप्रिल ) – १.७५ कोटी
  • एकूण कलेक्शन ( ९ दिवस ) – १०४.२५ कोटी

सलमान खानच्या सिनेमाने ९ दिवसांमध्ये फक्त १०४.२५ कोटींचा गल्ला जमावला आहे. ‘फिल्मीबीट’ने दिलेल्या वृत्तानुसार सलमान खानने ‘सिकंदर’ सिनेमासाठी १२० कोटींचं मानधन घेतलं होतं. मात्र, चित्रपट प्रदर्शित होऊन १० दिवस झालेत तरीही, अद्याप हे मानधन बॉक्स ऑफिसवर वसूल झालेलं नाही. हा सिनेमा बनवण्यासाठी तब्बल २०० कोटींचा खर्च आला होता. तर, रश्मिका मंदानाला या सिनेमासाठी ५ कोटींचं मानधन देण्यात आलं आहे. बॉक्स ऑफिसवर मूळ बजेट वसूल करण्यास संघर्ष करावा लागत असल्याने सलमानचा सिनेमा फ्लॉप ठरला आहे.

दरम्यान, सलमान खानच्या सिकंदरमध्ये सलमान खान, रश्मिकासह दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर, सत्यराज, शर्मन जोशी, काजल अग्रवाल, किशोर, संजय कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकले आहेत. तर, सिनेमाचं दिग्दर्शन ए. आर. मुरुगादोस यांनी केलं आहे.