Sikandar Box Office Collection Day 7 : सलमान खानच्या ‘सिकंदर’ सिनेमाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, यंदा सलमानची बॉक्स ऑफिसवरची जादू फिकी पडल्याचं पाहायला मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन ७ दिवस उलटून गेले तरीही ‘सिकंदर’ला अद्याप १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेता आलेली नाही. याशिवाय सिनेमाचं मूळ बजेट अर्धही वसूल झालेलं नाही. यावरून ‘सिकंदर’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्याचं पाहायला मिळत आहे.
‘सिकंदर’च्या निमित्ताने सलमान खान दीड वर्षांनी बॉक्स ऑफिसवर पुनरागमन करणार होता. त्यामुळे हा सिनेमा पहिल्याच दिवशी ग्रँड ओपनिंग करेल असा सर्वांना अंदाज होता. पण, सिनेमाने पहिल्याच दिवशी फक्त २६ कोटींची कमाई केली. ‘सिकंदर’ला देशभरात मिळालेले शो पाहता ही कमाई फार कमी आहे. याउलट विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाला तुलनेने कमी शोज मिळूनही त्या सिनेमाने पहिल्याच दिवशी ३३.१ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.
‘सिकंदर’च्या कमाईत दिवसेंदिवस घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सलमानच्या सिनेमाला सहाव्या आणि सातव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ४ कोटींचा टप्पा देखील गाठता आलेला नाही. यामुळे भाईजानच्या सर्वच चाहत्यांना धक्का बसला आहे.
‘सिकंदर’ सिनेमाची कमाई ( सॅकनिल्कच्या वृत्तानुसार )
- पहिला दिवस ( रविवार ३० मार्च ) – २६ कोटी
- दुसरा दिवस – २९ कोटी
- तिसरा दिवस – १९.५ कोटी
- चौथा दिवस – ९.७५ कोटी
- पाचवा दिवस – ६ कोटी
- सहावा दिवस – ३.५ कोटी
- सातवा दिवस (शनिवार ६ एप्रिल )- ३.७५ कोटी*
‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार सलमानच्या सिनेमाने सात दिवसांमध्ये ९७.५० कोटींचा गल्ला जमावला आहे. अद्याप या सिनेमाला १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेता आलेला नाही.
सलमान खानचा ‘सिकंदर’ २०० कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. ७ दिवसांत सिनेमाने फक्त ९७.५० कोटी कमावल्याने अजून मूळ बजेट वसूल करण्यापासून हा सिनेमा खूप दूर आहे. तर, सलमानने या सिनेमासाठी तब्बल १२० कोटी मानधन घेतल्याचं वृत्त ‘फिल्मीबीट’ने दिलं आहे. तर, रश्मिका मंदानाला या सिनेमासाठी ५ कोटींचं मानधन देण्यात आलं आहे.
दरम्यान, सलमान खानच्या सिकंदरमध्ये सलमान खान, रश्मिकासह दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर, सत्यराज, शर्मन जोशी, काजल अग्रवाल, किशोर, संजय कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकले आहेत. तर, सिनेमाचं दिग्दर्शन ए. आर. मुरुगादोस यांनी केलं आहे.