Salman Khan Sikandar Movie Box Office Collection Day 2 : सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सिकंदर’ चित्रपट ३० मार्च २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाच्या माध्यमातून जवळपास दीड वर्षांनी बॉलीवूडच्या भाईजानने बॉक्स ऑफिसवर पुनरागमन केलं आहे. त्यामुळे, या सिनेमाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या. पण, ‘सिकंदर’ने सर्वांचीच निराशा केली आहे.
‘सिकंदर’ सिनेमा प्रदर्शित होताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला होता. ‘सिकंदर’चं एडिटिंग, कथानक, दिग्दर्शन या सगळ्या गोष्टींवर प्रेक्षकांसह चित्रपट समीक्षकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. खरंतर, सलमानचा चित्रपट पहिल्याच दिवशी ग्रँड ओपनिंग करेल असा प्रत्येकाचा अंदाज होता. पण, ‘सिकंदर’ला यंदाच्या वर्षी ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘छावा’चा रेकॉर्ड मोडता आलेला नाही.
‘छावा’ने ओपनिंग डेला तब्बल ३३.१ कोटींची कमाई केली होती. तर, सलमानच्या ‘सिकंदर’ला पहिल्या दिवशी केवळ २६ कोटी कमावता आले. तर, सोमवारी या सिनेमाने २९ कोटींचा गल्ला जमावल्याचं वृत्त ‘सॅकनिल्क’ने दिलं आहे. यामुळे ‘सिकंदर’ची दोन दिवसांची एकूण कमाई ५५ कोटी इतकी झाली आहे. संपूर्ण भारतात ‘सिंकदर’चे ८ हजार शो आयोजित करण्यात आले होते. या तुलनेत कलेक्शनची आकडेवारी कमी आहे.
दुसरीकडे, ‘सिकंदर’चा प्रदर्शित झाल्यावरही प्रेक्षक ‘छावा’ सिनेमा पाहत आहेत. विकी कौशलच्या चित्रपटाने ४५ व्या दिवशी ६०६ कोटींचा आकडा पार केला आहे. २०२५ मध्ये ‘छावा’ हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे आणि सध्याची स्थिती पाहता बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चा रेकॉर्ड मोडणं अशक्य आहे.
सलमान खानचा ‘सिकंदर’ सिनेमा प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच दिवशी ऑनलाईन लीक झाला होता. तमिळरॉकर्स, मुव्हीरुल्झ, फिल्मीझिला आणि टेलिग्राम ग्रुप सारख्या प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाच्या बेकायदेशीर स्ट्रीमिंग लिंक्स व्हायरल करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, २०२३ नंतर सलमान ( Salman Khan ) पहिल्यांदाच ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर परतला आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना, काजल अग्रवाल, सत्यराज आणि शर्मन जोशी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.