Amitabh Bachchan : सिनेविश्वात काम करताना अनेकदा अ‍ॅक्शन सीन करावे लागतात. प्रेक्षकांना अ‍ॅक्शन सीन पाहणे फार आवडते. मात्र, असे सीन शूट करताना काही कलाकारांना दुखापतसुद्धा होते. अनेकदा चित्रपटातील दोन कलाकार एकमेकांवर हल्ला करताना दिसतात. असे सीन शूट करताना काही वेळा चुकून जोरात हल्ला होतो आणि समोरील कलाकाराला दुखापत होते. असंच काहीसं ‘सिकंदर का मुकद्दर’मधील एका अभिनेत्याबरोबर घडलं. त्यानं थेट बिग बी अमिताभ बच्चन यांच्या डोक्यात जोरात मारलं. या अभिनेत्याच्या मनात त्या गोष्टीची आजही खंत आहे, असं त्यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

अमिताभ बच्चन यांच्या ‘युद्ध’ या टीव्ही शोमध्ये अभिनेता अविनाश तिवारीनं एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. या शोमध्ये एक अ‍ॅक्शन सीन होता. त्यामध्ये त्याला अमिताभ बच्चन यांच्या डोक्यावर मारायचं होतं. अभिनेत्यानं अमिताभ बच्चन यांच्या डोक्यावर मारल्याने त्याला आजही त्या गोष्टीची खंत वाटते, असं त्यानं सांगितलं आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबातील मुलाची कान्स फिल्म फेस्टिवलपर्यंत मजल; रोहित कोकाटे प्रवासाबद्दल म्हणाला, “जन्म झाल्यापासून…”

सध्या अविनाश तिवारी त्याच्या ‘सिकंदर का मुकद्दर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर शुक्रवारी (२९ नोव्हेंबर) स्ट्रीम झाला आहे. त्यामध्ये अभिनेत्री तमन्ना भाटियासुद्धा मुख्य भूमिकेत आहे. नुकतीच दोन्ही कलाकारांनी स्क्रीन लाइव्हला मुलाखत दिली. त्यावेळी मुलाखतीत अविनाशनं अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा हा किस्सा सांगितला आहे.

नेमकं काय म्हणाला अविनाश?

“टीव्ही शो ‘युद्ध’मध्ये मी अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदाच भेटलो होतो. त्यावेळी एक अ‍ॅक्शन सीन शूट करायचा होता. मी त्याआधी कधीच अ‍ॅक्शन सीन केलेला नव्हता. सीन सुरू होता तेव्हा मी अमिताभ यांना पहिल्यांदा डोक्यावर मारलं आणि त्यानंतर मी त्यांना पुन्हा एकदा मारलं. कारण तोपर्यंत सीन कट झाला, असं सांगण्यात आलं नव्हतं. पुढे मी अमिताभ बच्चन यांच्याजवळ गेलो आणि त्यांची माफी मागितली. तसेच घाबरत मी त्यांना म्हणालो की, आपल्याला याची प्रॅक्टिस केली पाहिजे. त्यावर ते त्यांच्या डोक्याला हात लावून म्हणाले की, आपण हा सीन सावकाश आणि हळूहळू शूट करू.”

हेही वाचा : Shilpa Shetty and Raj Kundra : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा अडचणीत, घर आणि ऑफिसवर ईडीची धाड

या मुलाखतीमध्ये अविनाशनं त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील यशाच्या वाटचालीबद्दलसुद्धा माहिती दिली. तो म्हणाला, “संघर्ष हा माझ्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे, असं मी माझ्या मनाला समजावलं होतं. मी इंजिनियरिंग करत होतो, त्यावेळी मी अभिनय क्षेत्रात काम करायचं, असं ठरवलं. त्यानंतर मी न्यूयॉर्क फिल्म अकादमीमध्ये प्रशिक्षण घेण्याची तयारी केली आणि तेथूनच माझ्या संघर्षाला सुरुवात झाली.”