Hum Aapke Bina Song: सलमान खानचा ( Salman Khan ) बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘सिकंदर’ चित्रपटाची सध्या चहूबाजूने चर्चा सुरू आहे. ३० मार्चला प्रदर्शित होणारा भाईजानचा हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अ‍ॅडवान्स बुकिंग सुरू होताच ‘सिकंदर’ चित्रपटाच्या तिकिटाचे दर गगनाला भिडले आहेत. तरीही अनेक ठिकाणी ‘सिकंदर’चे शो हाऊसफुल्ल झाले आहेत. अशातच आता या चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे.

‘जोहरा जबीन’, ‘बम बम भोले’ आणि ‘सिकंदर नाचे’ या गाण्यांनंतर ‘सिकंदर’ ( Sikandar ) चित्रपटातील चौथ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. हे एक रोमँटिक गाणं आहे. ‘हम आपके बिना’ असं ‘सिकंदर’ चित्रपटातील या नव्या गाण्याचं नाव आहे. ज्यामध्ये सलमान खान व रश्मिका मंदानाची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हे गाणं लोकप्रिय गायक अरिजीत सिंगने गायलं आहे.

गेल्या दोन वर्षात अरिजीत सिंगने सलमान खानच्या चित्रपटासाठी हे तिसरं गाणं गायलं आहे. २०१४मध्ये झालेल्या वादानंतर अरिजीतने सलमानच्या चित्रपटाची गाणी गाणं बंद केलं होतं. पण नऊ वर्षांनंतर सलमान-अरिजीतचा वाद संपुष्टात आला आणि २०२३मध्ये अरिजीतने सलमानच्या ‘टायगर ३’ चित्रपटातील दोन गाणी गायली. त्यानंतर आता ‘सिकंदर’ चित्रपटातील अरिजीतच्या आवाजातील ‘हम आपके बिना’ गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं आहे. आतापर्यंतला या गाण्याला युट्यूबवर ४.९ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले असून चौथ्या क्रमांकावर ट्रेंड होतं आहे.

दरम्यान, ‘सिकंदर’चे दिग्दर्शक ए.आर.मुरुगादॉस यांनी ट्रेलर लॉन्च सोहळ्यात स्पष्ट केलं की हा चित्रपट रिमेक नाही. ते म्हणाले, “चित्रपटाची कथा नवीन आणि ओरिजिनल आहे. प्रत्येक सीन आणि फ्रेम विचारपूर्वक केली आहे. जेणेकरून प्रेक्षकांना नवीन अनुभव मिळेल.” जसजसी ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे. तशी प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढत आहे. या चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदाना व्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर झळकणार आहे. तसंच ‘बाहुबली ‘चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायिकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.