बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शक बोनी कपूर हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. नुकतंच कर्नाटकमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी एका तपासादरम्यान लाखों रुपयांची चांदीची भांडी जप्त केली आहेत. ही भांडी बोनी कपूर यांची असल्याचे सांगितले जात आहे. कर्नाटकातील दावणगेरेच्या हद्दीतील हेब्बालू टोलनाक्याजवळील चेकपोस्टवर ही भांडी जप्त करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कोणत्याही योग्य कागदपत्रांशिवाय चांदीची भांडी चेन्नईहून मुंबईला बीएमडब्ल्यू कारमधून नेली जात होती. भांडी पाच पेट्यांमध्ये ठेवली होती. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी चांदीची वाटी, चमचे, पाण्याचे मग आणि प्लेट जप्त केलं आहे. याप्रकरणी कारचा चालक सुलतान खान आणि प्रवासी हरीसिंग याच्याविरुद्ध दावणगेरे ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा : अमरिश पुरी यांचा नातू ओटीटी सेन्सॉरशीपच्या विरोधात; सलमान खानचं वक्तव्य खोडून काढत म्हणाला…
पोलिसांच्या तपासादरम्यान, कार बोनी कपूर यांच्या मालकीच्या ‘बेव्यू प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेच्या नावावर रजिस्टर असल्याचं स्पष्ट झालं आहे. चौकशीदरम्यान हरी सिंगने चांदीची भांडी बॉलीवूड चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या कुटुंबाची असल्याची कबुली दिली आहे. यासंबंधित अधिकृत कागदपत्रे सादर न केल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी चांदीच्या वस्तू जप्त केल्या आहेत.
आणखी वाचा : “हिला पद्मश्री पुरस्कार कशासाठी?” असं विचारणाऱ्या ट्रोलर्सना रवीना टंडनचं चोख उत्तर, म्हणाली…
ही चांदीची भांडी निर्माते बोनी कपूर यांच्या कुटुंबातीलच आहेत की नाही याचाही तपास सध्या सुरू आहे. या भांड्यांची किंमत ३९ लाख असल्याचं स्पष्ट झालं आहे. बोनी कपूर यांनी चित्रपट निर्मितीसह अभिनय क्षेत्रातही नुकतंच पदार्पण केलं. त्यांनी रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘तू झुठी मैं मक्कार’मध्ये काम केलं. यात त्यांचा अभिनय प्रेक्षकांना पसंत पडला होता.