लोकप्रिय गायिका अलका याज्ञिक यांनी बॉलीवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. त्यांनी आजवर १६ हून अधिक भाषांमध्ये सुमारे दोन हजारपेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड केली आहेत. त्यांनी गायलेली बहुतांशी गाणी हिट राहिली आहेत. ५८ वर्षांच्या अलका याज्ञिक अनेक स्टेज शो करतात, पण आता त्यांना एका दुर्मिळ आजाराचं निदान झालं आहे. सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस असं या आजाराचं नाव आहे. यामुळे त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे.
मागच्या ४० वर्षांपासून गायनक्षेत्रात सक्रिय असलेल्या अलका याज्ञिक यांनी गायनाव्यतिरिक्त ‘सा रे ग मा प लिएल चॅम्प्स’, ‘इंडियन आयडॉल’, ‘सुपरस्टार सिंगर’ यासह टेलिव्हिजनवरील अनेक रिॲलिटी शोजचे परीक्षण केले आहे. लोकांना त्यांची गाणी आणि करिअरबद्दल बऱ्यापैकी माहित आहे, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप जणांना माहित नाही. आपल्या गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायिकेची लव्ह स्टोरी खूपच हटके आहे.
बॉलीवूड गायिका अलका याज्ञिक यांना दुर्मिळ आजाराचं निदान, काहीच ऐकू येत नसल्याची दिली माहिती
अलका यांचा जन्म २० मार्च १९६६ मध्ये कोलकातामध्ये झाला. गुजराती कुटुंबात जन्मलेल्या अलका यांच्या आईही शास्त्रीय संगीत गायिका होत्या. अलका यांनी लहान वयातच शास्त्रीय गाणं शिकायला सुरुवात केली. ६ व्या वर्षापासून त्यांनी कोलकाता आकाशवाणी आणि ऑल इंडिया रेडिओवर गायला सुरूवात केली होती. १० व्या वर्षी त्या आईसोबत मुंबईत आल्या. त्या लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. राज कपूर यांनी अलका यांच्या आवाजातील जादू ओळखली आणि त्यांना संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत यांच्याकडे पाठवले. लक्ष्मीकांत यांनाही अलका यांचा आवाज आवडला. पण त्यावेळी अलका यांचा आवाज परिपक्व झाला नव्हता, त्यामुळे सिनेमात गाणे गाण्यासाठी त्यांना थोडं थांबावं लागणार होतं.
अलका याज्ञिक यांची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. अलका यांच्या पतीचे नाव नीरज कपूर आहे. अलका वैष्णोदेवीला जात असताना नीरज यांना पहिल्यांदा ट्रेनमध्ये भेटल्या होत्या. मात्र, अलका आणि नीरज हे वेगवेगळ्या क्षेत्रातील असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना लग्न करण्याआधी सावध केलं होतं. मात्र दोघेही आपल्या निर्णयावर ठाम होते आणि त्यांनी १९८९ मध्ये लग्न केलं. पण लग्न झाल्यानंतर या दोघांनाही वेगळं राहावं लागलं.
नीरज हे बिझनेसमन आहेत आणि ते शिलाँगला राहायचे, तर अलका कामानिमित्त मुंबईत राहायच्या. दोघेही एकमेकांना कायम भेटायला जायचे. त्यांनी त्यांचा संसारच असा वेगवेगळ्या शहरांमध्ये राहून केला. मुलीच्या जन्मानंतर नीरज यांनी मुंबईला शिफ्ट होण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना बिझनेसमध्ये मोठा तोटा झाला. त्यामुळे त्यांनी आधीप्रमाणे वेगवेगळ्या शहरांमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही लग्न केल्यापासून लाँग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये आहेत. त्यांच्या मुलीचं नाव सायशा असून तिचं लग्न झालं आहे.