गायक व संगीतकार अमाल मलिक (Amaal Mallik)ने नुकतीच एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केल्याचे पाहायला मिळाले. तो सध्या क्लिनिकल डिप्रेशनमध्ये असल्याचे त्याने उघड केले. त्याच्या या अवस्थेला त्याचे आई-वडील जबाबदार असल्याचा धक्कादायक खुलासा त्याने या पोस्टमधून केला आहे. त्याचा भाऊ अरमान मलिक व त्याच्यामध्ये जो दुरावा निर्माण झाला आहे, त्यालादेखील त्याचे पालक जबाबदार असल्याचे त्याने या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. आता मात्र ही पोस्ट अमालने डिलीट केली आहे. अमालने जी पोस्ट शेअर केली होती, त्यावर त्याची आई ज्योती मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मला वाटत नाही…
हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना ज्योती मलिक म्हणाल्या, “मला वाटत नाही की, यामध्ये मीडियाने सहभागी होण्याची गरज आहे. त्याने जे काही सोशल मीडियावर पोस्ट केले आहे, ती त्याची निवड आहे. मला माफ करा, धन्यवाद!”, ज्योती मलिक यांनी अमालने जी पोस्ट शेअर केली आहे, ती त्याची मर्जी असल्याचे म्हटले आहे. अमाल हा ज्योती मलिक व डब्बू मलिक यांचा मुलगा आहे आणि प्रसिद्ध गायक अनू मलिक यांचा पुतण्या आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यानंतर अमालने ही पोस्ट डिलिट केली आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करीत लिहिले, “तुमच्या प्रेम व पाठिंब्यासाठी धन्यवाद. पण माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका. मीडिया पोर्टलने माझ्या परिस्थितीबद्दल कोणतेही खळबळजनक आणि नकारात्मक मथळे देऊ नयेत, अशी माझी विनंती आहे. या सगळ्याबद्दल मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी मला खूप हिंमत लागली. हा माझ्यासाठी अत्यंत कठीण काळ आहे. मी माझ्या कुटुंबावर कायम प्रेम करीत राहीन.पण, आता मी खूप या सगळ्यापासून दूर आहे. आम्हा दोघा भावंडांमध्ये काहीही बदलणार नाही. अरमान व मी एक आहोत. आमच्यामध्ये काहाही येऊ शकत नाही”, असे म्हणत त्याच्या पोस्टवरून त्याच्या कुटुंबाला त्रास देऊ नका असे अमाल म्हणाला.

अमालने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “मी आता अशा टप्प्यावर पोहोचलो आहे की, मी ज्या वेदना निमूटपणे सहन केल्या आहेत, त्याबद्दल मी शांत बसू शकत नाही. माझ्या लोकांचं आयुष्य सुरक्षित बनविण्यासाठी मी रात्रंदिवस कष्ट केले; पण तरीही मला कमी लेखले गेले. गेल्या दशकभरात १२६ गाणी जी रिलीज केली आहेत, त्या प्रत्येक गाण्यासाठी मी माझे रक्त आटवले आहे, घाम गाळला आहे, अश्रू खर्च केले आहेत. त्यासाठी मी माझी स्वत:ची स्वप्नं बाजूला ठेवली आहेत. त्यांनी जगासमोर ताठ मानेनं जगावं यासाठी मी कष्ट केले आहेत.आज आमची जी ओळख आहे, ती तयार करण्यासाठी, तसेच अमुक एकाचा मुलगा व पुतण्या ही ओळख मिटविण्यासाठी मी माझ्या भावाबरोबर गाण्याच्या क्षेत्रात कष्ट केले आहेत. मी व अरमाननं इंडस्ट्रीमध्ये चांगलं काम केलं आहे. पण, माझ्या पालकांच्या कृतीमुळे माझ्यात व अरमानमध्ये दुरावा आला आहे. मी व माझा भाऊ एकमेकांपासून दूर जाण्याला माझे पालक जबाबदार आहेत. आम्ही एकमेकांपासून खूप दूर गेलो आहोत. त्याचे मला सर्वांत जास्त दु:ख आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी माझा आत्मविश्वास, माझी मैत्री, माझे रिलेशनशिप, माझी मन:स्थिती बिघडवण्याची व मला त्रास देण्याची एकही संधी सोडली नाही.” तसेच त्याने कुटुंबाशी इथून पुढे फक्त व्यावसायिकदृष्ट्या संबंध राहतील, असेही स्पष्ट केले. त्याबरोबरच सध्या तो क्लिनिकल डिप्रेशनचा सामना करीत असल्याचेदेखील त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलेय. अमालने आता ही पोस्ट डिलीट केली आहे.
दरम्यान, अमाल मलिक व अरमान मलिक यांनी गेल्या काही वर्षांत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मैं रहूँ या ना रहूँ, जब तक, चले आना, हुआ हैं आज पहली बार अशा अनेक गाण्यांसाठी अमाल-अरमानची जोडी ओळखली जाते.