आज मुंबईतल्या विले-पार्ले या ठिकाणी असलेल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आशा भोसले यांच्यावरील पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या सोहळ्याला भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, सरसंघचालक मोहन भागवत, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात हृदयनाथ मंगेशकर यांनी आशा भोसले यांनी लहान असल्यापासूनच किती संघर्ष केला हे सांगितलं. तसंच आशा भोसले या आज बोलताना भावूक झाल्या. माझे आता थोडेच दिवस राहिले आहेत असं आशाताई म्हणाल्या.
काय म्हटलं आहे आशा भोसलेंनी?
“मित्र आणि मैत्रिणींनो माझा नमस्कार. उपस्थित सर्व थोरांना माझा प्रणाम. आज जे पुस्तक प्रकाशन झालं त्याची मला कल्पना नव्हती. प्रसाद महाडकर, अमेय हेटे, आशिष शेलार यांच्यासह सगळ्यांनी मेहनत घेऊन हे पुस्तक प्रकाशित केलं. गौतम राजाध्यक्ष आणि यशवंत देव यांना पुस्तक अर्पण केलं आहे. आज जे फोटो पाहात आहात तशी मी दिसत नाही. गौतम राजाध्यक्षांच्या कॅमेराने फोटो काढल्यावर कुणीही सुंदरच दिसायचं.” असं आशा भोसले म्हणाल्या.
हृदयनाथ मंगेशकरांनी सांगितला किस्सा, “आशाताई गायची नाही, माझे वडील आईला म्हणाले होते, ही..”
लता मंगेशकरांच्या आठवणींना उजाळा
लता मंगेशकर यांच्या आठवणींना आशाताईंनी उजाळा दिला. “दीदीच्या नावाशिवाय हा कार्यक्रम संपता कामा नये. मी घरातली तिसरी बहीण. आमचा एक पांडव गेला तरीही मी अजून आहे. मला घरी भीम म्हणायचे. मोगरा फुलला हे गाणं दीदीच्या मुखात खूप छान वाटलं होतं. तिने आम्हाला सांभाळलं, अजूनही सांभाळते आहे.” असं आशा भोसले म्हणाल्या.
स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण
“मी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटले होते. माझी आई त्यांना जेवण द्यायला जायची. दादरला त्यांच्या घरी आम्ही यायचो. त्यांनी मला विचारलं तू दीनानाथसारखी गातेस का? तेव्हा मी हो म्हटलं, पण त्यांच्यासारखं गायचं म्हणजे काय? मी गायले आणि ते म्हणाले आणखी प्रॅक्टिस केली पाहिजेस”, अशी आठवण आशाताईंनी सांगितली.
माईक समोर आला की घसा कोरडा पडतो
“माईक समोर आला की घसा कोरडा पडतो. ६० वर्षांची असताना मी साडे अकरा हजार गाणी गायली होती. जगात सगळ्यात जास्त रेकॉर्ड माझा आवाज आहे असं म्हणतात. याची नोंद गिनिज बुकानेही घेतली आहे. मी यासाठी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना प्रणाम करते. रेकॉर्डिस्ट नसते तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचलाच नसता.” असंही आशा भोसले यांनी म्हटलंय.
“माझ्या आयुष्यात कधी असं पुस्तक प्रकाशित होईल याची कल्पना नव्हती. माझं आता वय झालं आहे. फार थोडे दिवस राहिले आहेत. असंच प्रेम देत राहा” अशा शब्दांत आशा भोसलेंनी उपस्थितांच्या काळजाला हात घातला. आशा भोसले यांच्यावर ९० मान्यवरांनी लिहिलेल्या ९० लेखांचं आणि दुर्मिळ छायाचित्रांचं स्वरसामिनी आशा या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला. त्यावेळी आशा भोसलेंनी हे वक्तव्य केलं.