गायक बी प्राक(B Praak) या त्याच्या ‘सारी दुनिया जला देंगे’, ‘मन भरिया २.०’ अशा गाण्यासाठी ओळखला जातो. आता तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींवर केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे. गायक बी प्राकच्या नवजात बाळाचे २०२२ मध्ये निधन झाले होते. जन्म होता क्षणी त्याचा मृत्यू झाला होता. ही माहिती त्याने सोशल मीडियावर शेअर केली होती. बी प्राकने नुकतीच एक मुलाखत दिली. याविषयी या मुलाखतीत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
बी प्राक झाला भावूक
बी प्राकने शुभंकर मिश्राला मुलाखत दिली. यावेळी तो त्याच्या बाळाच्या मृत्यूविषयी पहिल्यांदाच बोलला. त्याने म्हटले, “आयुष्यात सगळ्यात जड काय वाटले असेल, कोणाला उचलून घेणे, तर माझ्या मुलाचे…, इतका भार एवढ्याशा बाळाचा यापेक्षा जड गोष्ट मी माझ्या आयुष्यात उचलली नाही. मी माझ्या आईला म्हणत होतो की, आपण हे काय करीत आहोत. इतका भार मी कधीही उचलला नाही. मी जेव्हा पुन्हा दवाखान्यात गेलो तर मीरा माझ्याकडे पाहून म्हणाली, “दफन करून आलास ना त्याला, मला दाखवायचं तरी” तो खूप वाईट काळ होता. आम्ही आमच्या आयुष्यातील सगळे काही गमावले. खूप नकारात्मकता आली. ज्या पद्धतीने मी ती परिस्थिती हाताळली, त्यामुळे माझी पत्नी आजपर्यंत माझ्यावर नाराज आहे”, असे म्हणत बी प्राकने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
२०२२ मध्ये बी प्राकने ही दु:खद माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्याने म्हटले होते, “खूप दु:खासह आम्हाला हे सांगावे लागत आहे की, आमच्या नवजात बाळाचा जन्म होताच मृत्यू झाला. पालक म्हणून आमच्यासाठी हा फार वेदनादायी काळ आहे. डॉक्टर आणि संपूर्ण स्टाफने ज्या पद्धतीने शेवटपर्यंत प्रयत्न केले, त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. आमच्या सगळ्यांसाठीच हा कठीण काळ आहे. सगळ्यांना विनंती आहे की, आम्हाला आमचा खासगी वेळ द्या. -तुमचेच मीरा आणि बी प्राक.”
हेही वाचा: ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
दरम्यान, मीरा आणि बी प्राकने ४ एप्रिल २०१९ ला लग्नगाठ बांधली होती. २०२० मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला.