मिका सिंग हा बॉलीवूडमधील लोकप्रिय गायक आहे. भारतातील श्रीमंत गायकांपैकी एक असलेल्या मिकाची इंडस्ट्रीतील दिग्गजांशी खूप चांगली मैत्री आहे. तो अनेकदा सलमान खान, शाहरुख खान यांच्याबरोबरचे किस्से सांगत असतो. आता त्याने शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत मिकाने या दोन्ही स्टार्सबरोबरी एक आठवण सांगितली.
मिकाने सांगितलं की त्याने अमिताभ बच्चन, शाहरुख खान व आणखी एका व्यकत्तीसाठी महागड्या अंंगठ्या घेतल्या होत्या. “मी शाहरुख खान, गुरदास मान आणि अमिताभ बच्चन यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची अंगठी भेट दिली. मला फक्त या तीन लोकांसाठी काहीतरी करायचे होते,” असं तो म्हणाला.
शाहरुख खानने अंगठी परत करण्याचा प्रयत्न केला होता, असं मिकाने नमूद केलं. शाहरुखने ही अंगठी म्हणजे खूप महाग गिफ्ट आहे, असं म्हणत परत करण्याचा प्रयत्न केला. पण मिकाने ती घेण्यास नकार दिला. “तेव्हापासून आम्ही थोडा संवाद साधू लागलो, तो हिमेश रेशमियाबरोबर मी एक शूट करत होतो, त्यासाठीदेखील आला होता,” असं मिका म्हणाला.
मिकाने बिग बींचं केलं कौतुक
सलमान खान, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधण्यास सक्षम असल्याबद्दल खूप कृतज्ञ वाटतं, असं मिकाने नमूद केलं. “आम्ही नेहमी पंजाबीत बोलतो आणि माझ्या वाढदिवसाला सर्वात आधी ते शुभेच्छा देतात,” असं मिका म्हणाला. त्याने अमिताभ बच्चन यांचं कौतुक केलं. “त्यांच्यासारखे लोक फक्त एक काळ गाजवतात असं नाही तर ते लोकांच्या मनावर राज्य करतात. तुम्ही कितीही मोठे झालात तरीही तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत राहता,” असं मिका म्हणाला.
मिकाने हिमेश रेशमियाचं कौतुक केलं आहे. “हिमेश भाऊ, लव्ह यू… कारण गायकांनाही अभिनय करणं शक्य आहे हे तू दाखवून दिलं,” असं मिका म्हणाला.
मिकाने करिअरच्या सुरुवातीला जो संघर्ष करावा लागला, त्याबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. गायला सुरुवात केली तेव्हा मिकाला फक्त ७५ रुपये मिळायचे. त्याने गिटार वाजवले, गाणी गायली, जागरण, कीर्तन आणि कव्वाली सादर केली. त्यानंतर दलेर मेहंदीला भेटल्यावर मिकाची परिस्थिती बदलली. “कोणतीही संधी आली तरी ती स्वीकारणं महत्त्वाचं आहे. नुसती स्वप्नं पाहून काही होत नाही, सत्य परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे,” असं मिका म्हणाला.