गायक आणि त्यांच्या लाइव्ह कॉन्सर्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. अनेकदा गायक कॉन्सर्टमध्ये लाइव्ह न गाता लिपसिंक करतात, असे आरोप अनेकदा केले जातात. याबद्दल भाष्य करीत प्रसिद्ध बॉलीवूड गायकाने रिअॅलिटी शो आणि लाइव्ह कॉन्सर्टबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. “९९ टक्के लाइव्ह परफॉर्मन्स खोटे असतात आणि त्यातून श्रोत्यांची दिशाभूल केली जाते,” असे त्याने म्हटले.
९० च्या दशकात पलाश सेन याच्या ‘मायरी’ ह्या एकाच गाण्याने कित्येकांच्या मनावर गारुड केले होते. आतापर्यंत त्याने अनेक एक से बढकर एक गाणी गायली. नुकतीच त्याने ‘लल्लनटॉप’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने संगीतविश्वाबद्दलचे अनेक खुलासे करत रिअॅलिटी शो आणि लाइव्ह कॉन्सर्टमधून प्रेक्षकांची कशा प्रकारे दिशाभूल केली जाते हे सांगितले.
पलाश Dannii Minogue या गायिकेचे उदाहरण देत म्हणाला, “डॅनीचा ऑस्ट्रेलियात लाइव्ह शो होता. या शोला प्रचंड गर्दी होती. पण ती लाइव्ह गात नसून फक्त लिपसिंक करत आहे, असे प्रेक्षकांच्या लक्षात आले आणि त्या लोकांनी तिला अंडी फेकून मारली होती. भारतात काय खोटे, काय खरे हे प्रेक्षकांना कळल्यावर आपल्याकडची ही स्थिती बदलेल. शंकर महादेवन, अरिजीत सिंह, सोनू निगम, दलेर मेहंदी, सुनिधी चौहान असे काही प्रसिद्ध गायक लिपसिंक न करता लाइव्ह गातात. पण बाकीचे ९९ टक्के गायक फक्त रेकॉर्ड केलेले ट्रॅक वाजवतात. मी त्यांची नावे सांगणार नाही पण हे दुर्दैवी आहे. हे फक्त भारतात होतेय असे नाही; हे जगभरात होतेय. प्रेक्षकांची दिशाभूल करणारे हे गायक स्वतःशीच प्रामाणिक नाहीत. यापेक्षा आणखी काय बोलणार!”
हेही वाचा : “म्युझिक माफिया आहेच…” ‘मायरी’फेम पलाश सेन यांचा संगीतविश्वाबद्दल मोठा दावा
पुढे रिअॅलिटी शोजबाबत बोलताना तो म्हणाला, “मी रिअॅलिटी शोजही केले, पण याचा मला पश्चात्ताप होतो. तिथे इतकी स्क्रिप्टिंग असते की विचारूच नका. हे सगळे रिअॅलिटी शो खोटे असतात. रिअॅलिटीच्या नावावर तिथे काहीच रिअॅलिटी नसते. या शोमध्ये कुठल्याही प्रकारच्या भावना नसतात. तो फक्त एक टीव्ही शो आहे आणि तो ‘सास भी कभी बहू थी’ सारखा पाहायला हवा. एक रिअॅलिटी शो जज करताना माझा दलेर पाजीसोबत वाद झाला. ते स्क्रिप्टचे पालन करायचे आणि मी खरे वागण्याचा प्रयत्न करत होतो.” त्याचे हे बोलणे आता खूप चर्चेत आले आहे.