Usha Uthup husband death: पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित पॉप गायिका उषा उथुप यांच्या कुटुंबातून एक वाईट बातमी समोर आली आहे. उषा उथुप यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यांचे पती जानी चाको उथुप यांची हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली. घरी टीव्ही पाहत असताना ही घटना घडली.
कोलकातामधील घरी टीव्ही पाहत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं अशी माहिती समोर आली आहे. जानी उथुप यांनी अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली. त्यांची प्रकृती ढासळत असल्याचे पाहून कुटुंबियांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. जानी ७८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने कुटुंबासह संगीत आणि चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
जानी चाको उथुप हे चहा उत्पादनाच्या क्षेत्रात काम करायचे. या जोडप्याला एक मुलगा सनी आणि मुलगी अंजली ही दोन अपत्ये आहेत. उषा उथुप यांच्या पतीवर आज मंगळवारी (९ जुलै रोजी) अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.
जानी चाको उथुप हे उषा यांचे दुसरे पती होते. उषा यांनी दोन लग्नं केलीत. त्यांचे पहिले लग्न रामू अय्यरशी झाले होते. मात्र, फक्त पाच वर्षात ते विभक्त झाले. ७० च्या दशकाच्या सुरुवातीस उषा व जानी या दोघांची भेट झाली होती. पहिल्या घटस्फोटानंतर उषा यांनी जानी यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं.
उषा उथुप या बॉलीवूडमधी सुप्रसिद्ध गायिका आहेत. त्यांनी ६० च्या दशकात गायनास सुरुवात केली. ‘एक दो तीन चार’ या गाण्यानंतर त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख व लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट गाणी दिली. त्या काळात उषा यांनी दिग्गज संगीत दिग्दर्शक आरडी बर्मन आणि बप्पी लाहिरी यांच्याबरोबर अनेक हिट गाणी गायली. उषा उथुप यांनी १९६० व ७० च्या दशकात अनेक सुपरहिट पॉप गाणी गायली आहेत. त्यांना गाण्यांसाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कारही मिळाला होता.
उषा उत्थुप ‘दम मारो दम’, ‘मेहबूबा’, ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘वन टू चा चा’, ‘हरी ओम हरी’, ‘दोस्तों से प्यार किया’, ‘रंबा’, ‘कोई यहाँ आहा नाचे नाचे’ तसेच ‘नाका बंदी’ या गाण्यांसाठी ओळखल्या जातात.