भारतीय बॉक्स ऑफिसवर आज (१ नोव्हेंबर २०२४ रोजी) दोन मोठे सिनेमे रिलीज झाले आहेत. ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया ३’ हे दोन बहुचर्चित चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. दोन्ही चित्रपटांबाबत भारतीय प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मात्र, या दोन्ही चित्रपटांवर एका देशाने बंदी घातली आहे. या बंदीची कारणं वेगवेगळी आहे. सौदी अरेबियाने ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया ३’ प्रदर्शित न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. पौराणिक कथा आणि समलैंगिकतेशी संबंधित उल्लेखांमुळे या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे.
‘सिंघम अगेन’वर बंदी का?
‘पिंकविलाच्या’ अहवालानुसार, ‘सिंघम अगेन’ सिनेमातील रामायणाच्या संदर्भांमुळे सौदी अरेबियाने या चित्रपटावर बंदी घातली आहे. तसेच, या चित्रपटात हिंदू-मुस्लीम संघर्षाचाही मुद्दा असल्याचे म्हटले जात आहे, ज्यामुळे सौदी अरेबियाने या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
‘भूल भुलैया ३’ का प्रदर्शित होणार नाही?
दुसरीकडे, ‘भूल भुलैया ३’ चित्रपटात समलैंगिकतेसंदर्भातील उल्लेख असल्याची चर्चा आहे, यामुळे या चित्रपटावरही बंदी घालण्यात आली आहे. चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांमध्ये अशा कोणत्याही गोष्टीचा उल्लेख नसला तरी, हा कथेतील मोठा ट्विस्ट असण्याची शक्यता आहे.
‘सिंघम अगेन’मध्ये बॉलीवूड स्टार्सची मांदियाळी
‘सिंघम अगेन’ हा रोहित शेट्टीच्या ‘कॉप युनिव्हर्स’मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट आहे, ज्यामध्ये अजय देवगण, करीना कपूर खान, रणवीर सिंग, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात रामायणाचे अनेक संदर्भ घेण्यात आले असून यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रामायणातील काही प्रसंगांशी संबंधित दृश्य दिसतात.
हेही वाचा…अभिषेक बच्चनने लग्नानंतरही पालकांबरोबर राहण्याविषयी मांडले होते मत; म्हणाला, “माझ्या आईचा एक नियम…”
‘भूल भुलैया ३’ मध्ये नवीन कलाकारांची एंट्री
‘भूल भुलैया ३’ हा २००८ मध्ये आलेल्या ‘भूल भुलैया’ या ब्लॉकबस्टर फ्रँचायझीमधील तिसरा चित्रपट आहे, ज्यामध्ये कार्तिक आर्यन पुन्हा एकदा ‘रुह बाबा’च्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये विद्या बालन पुन्हा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षित या नवीन कलाकारांची भर पडली आहे.
हेही वाचा…‘द डर्टी पिक्चर’चा दुसरा भाग येणार का? विद्या बालनच मोठं विधान; म्हणाली, “मी पुन्हा…”
हे दोन्ही चित्रपट आज रिलीज झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांच्या अॅडव्हान्स बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता या दोन्हीपैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारतो हे लवकरच कळेल.