८० दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या अभिनयाने बॉलिवूड गाजवलं होतं. एका मराठी कुटुंबातून आलेल्या स्मिता यांना त्यावेळी ‘डस्की ब्यूटी’ म्हणून ओळखलं जायचं. पण स्मिता पाटील यांनी वयाच्या ३१ व्या वर्षीच या जगाला अलविदा केलं. १३ डिसेंबर १९८६ रोजी त्यांचं निधन झालं. स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन यांचं खास नातं होतं आणि बिग बींना एकदा स्मिता पाटील यांची एक खास आठवण सांगितली होती. त्यांच्या ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या अपघाताशी या आठवणीचं कनेक्शन आहे.
बॉलिवूडमध्ये गाजलेला ‘कुली’ हा चित्रपट सर्वांच्या लक्षात आहे. कारण या चित्रपटासोबतच शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना झालेल्या दुखापतीचीही जोरदार चर्चा झाली होती. ‘कुली’च्या शूटिंगदरम्यान झालेल्या अपघातानंतर अनेक चाहत्यांनी बिग बींच्या प्रकृतीसाठी नवस केला होता. पण हा अपघात घडण्याच्या एक दिवसापूर्वी अभिनेत्री स्मिता पाटील यांना त्याची कुणकुण लागली होती. एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात खुद्द बिग बींनी ही आठवण सांगितली होती.
आणखी वाचा- स्मिता पाटील यांच्या आठवणीत राज बब्बर झाले भावुक, शेअर केली खास पोस्ट
बिग बी म्हणाले होते, “‘कुली’च्या चित्रीकरणासाठी मी एकदा बंगळुरुला गेलो होतो. एके दिवशी मध्यरात्री २च्या सुमारास हॉटेलमधील फोन खणाणला. मला रिसेप्शनिस्टने सांगितले की, तुमच्यासाठी स्मिता पाटील यांचा फोन आला आहे. त्यावेळी मला धक्काचं बसला कारण इतक्या रात्री मी तिच्याशी कधीचं बोललो नव्हतो. पण, महत्त्वाचे काहीतरी काम असेल म्हणून मी तिच्याशी बोललो. स्मिताने मला विचारले की, तुमची प्रकृती कशी आहे, तुम्हाला काही झाले तर नाही ना? तर मी म्हणालो, हो माझी प्रकृती व्यवस्थित आहे. मग ती म्हणाली, मला तुमच्याबद्दल एक वाईट स्वप्न पडलं म्हणून मी इतक्या उशीरा तुम्हाला फोन केला. त्यानंतर त्याच्या दुसऱ्याचं दिवशी अमिताभ यांचा ‘कुली’च्या सेटवर अपघात झाला. पण, याने ढासळून न जाता स्मिता मला रुग्णालयात फुलांचा गुच्छ घेऊन भेटावयास आली होती.”
आणखी वाचा- राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या नात्यावर झाली होती बरीच टीका; राजकुमारकडे केला होता हट्ट
इतक्या वर्षांनीही हा अपघात बिग बींसोबतच त्यांच्या चाहत्यांनाही कायम लक्षात राहणारा आहे. कारण त्यातून बिग बींचा जणू पुनर्जन्मच झाला होता. दरम्यान स्मिता पाटील यांनी घरच्यांचा विरोध पत्करून राज बब्बर यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर स्मिता गरोदर राहिल्या आणि त्यांनी १३ डिसेंबर १९८६ रोजी मुलगा प्रतीकला जन्म दिला. पण प्रतीकच्या जन्माच्या वेळी स्मिता यांना खूप त्रास झाला. डिलिव्हरीच्या वेळी त्यांची तब्येत खूपच बिघडली. मुलाला जन्म दिल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच स्मिता यांनी वयच्या ३१ व्या वर्षीच या जगाचा निरोप घेतला.