Smita Patil Raj Babbar Love Story : स्मिता पाटील यांनी आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. स्मिता आता हयात नसल्या तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासह अभिनयाच्या चर्चा कायम होत असतात. एका मराठी कुटुंबातून आलेल्या स्मिता यांना त्यावेळी ‘डस्की ब्यूटी’ म्हणून ओळखलं जायचं. विवाहित राज बब्बर व स्मिता पाटील यांचं एकमेकांवर प्रेम होतं, त्यांनी लग्नही केलं पण मुलाच्या जन्मानंतर काही दिवसांनी स्मिता पाटील यांनी ३१ व्या वर्षीच यांनी जगाचा निरोप घेतला. राज बब्बर व स्मिता पाटील यांची लव्ह स्टोरी जाणून घेऊयात.

राज बब्बर आपल्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिले. करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळात ते मुस्लीम असलेल्या नादिरा जहीर यांच्या प्रेमात पडले होते. दोघंही नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेत होते, तिथेच ते प्रेमात पडले आणि १९७५ मध्ये त्यांनी आंतरधर्मीय लग्न केलं. लग्नानंतर दोघंही दिल्लीमध्येच राहत होते. मग त्यांची मुलगी जूहीच्या जन्म झाला. जबाबदाऱ्या वाढल्याने कामाची गरज होती, त्यामुळे जास्त पैसे कमवायला राज बब्बर मुंबईला आले. मुंबईत त्यांना काम मिळालं, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र मोठी उलथापालथ झाली.

स्मिताबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल राज म्हणालेले…

मुंबईत राज बब्बर यांची ओळख स्मिता पाटील यांच्याशी झाली. १९८२ मध्ये दोघांची पहिली भेट ‘भीगी पलकें’ चित्रपटाच्या सेटवर झाली. दोघांनी या चित्रपटात मुख्य भूमिका केल्या होत्या. होते. “आम्ही ओडिशाच्या राउरकेलामध्ये शूटिंग करत होतो. शूटिंगच्या वेळीच माझी आणि स्मिताची पहिली भेट झाली. या भेटीत सुरुवातीला आम्ही थोडी मजा- मस्ती केली. पण नंतर आमच्यात वादही झाले. ती रागात मला काही बोलली होती पण मला तिचे ते शब्द खूप भावले होते. मी तिच्या या रागावर त्याच क्षणी फिदा झालो होतो,” असं राज बब्बर स्मिता पाटील यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल म्हणाले होते.

राज व स्मिता नंतर प्रेमात पडले. राज बब्बर विवाहीत असून त्यांना दोन मुले होती. म्हणून स्मिता यांच्या आईने त्यांच्या आणि राज यांच्या नात्याला नकार दिला होता. दुसरीकडे पतीचं स्मिता पाटील यांच्याशी अफेअर आहे, हे समजल्यावर नादिराला मोठा धक्का बसला होता. “जेव्हा मी राज यांच्या तोंडूनच त्यांची प्रेमकहाणी ऐकली तेव्हा मला धक्का बसला होता. पण नंतर मी स्वतःला सांभाळलं कारण माझी दोन मुलं होती. जर आई स्वतःला सांभाळू शकली नाही तर मुलांचं काय होईल या विचाराने मी खंबीर राहिले. मी स्वतःला कामात व्यग्र ठेवलं,” असं २०१३ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत नादिरा म्हणाल्या होत्या.

smita patil raj babbar love story
स्मिता पाटील व राज बब्बर फोटो (सौजन्य – स्क्रीनशॉट)

कुटुंबियांचा विरोध पत्करून केलं लग्न

राज आणि नादिरा यानंतर वेगळे झाले आणि स्मिता यांनीही राज यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण हे त्यांच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं कारण राज अगोदरच विवाहित होते आणि त्यांना दोन मुलं होती. त्यामुळे स्मिता यांच्या आई- वडिलांनी या लग्नाला नकार दिला. विवाहित पुरुषाशी आपल्या मुलीने लग्न करणं त्यांच्या पालकांना अजिबात मान्य नव्हतं. पण स्मिता यांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन राज यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

राज यांनी नादिराला घटस्फोट न देता स्मिता यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर स्मिता गरोदर राहिल्या आणि त्यांनी २८ नोव्हेंबर १९८६ रोजी मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मा वेळी स्मिता यांना खूप त्रास झाला आणि त्यांची प्रकृती बिघडली. मुलाच्या जन्मानंतर अवघ्या १५ दिवसांनी १३ डिसेंबर १९८६ रोजी त्यांचे निधन झाले.

राज व स्मिता यांचा मुलगा म्हणजे प्रतीक बब्बर होय. प्रतीक बब्बर लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने गर्लफ्रेंडशी प्रिया बब्बरशी लग्न केलं. प्रतीकने या लग्नात त्याच्या वडिलांना बोलावलं नव्हतं.