दिवंगत स्मिता पाटील व ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा अभिनेता प्रतीक बब्बर यांने दुसरं लग्न केलं आहे. प्रतीक त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीबरोबर लग्नबंधनात अडकला. त्याच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. प्रतीकने मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली, पण त्याने कुटुंबियांना आमंत्रित केलं नाही.

प्रतीक बब्बर आणि अभिनेत्री प्रिया बॅनर्जी आज व्हॅलेंटाइन डेला वाहबंधनात अडकले. प्रतीकचा सावत्र भाऊ अभिनेता आर्य बब्बर याने सांगितलं की, बब्बर कुटुंबातील कोणालाही प्रतीकने लग्नाचे निमंत्रण दिलेले नाही. प्रतीकने त्याचे वडील राज बब्बर यांनाही आमंत्रित केलं नाही. आर्यने यासाठी प्रतीकला दोष दिला नाही, तर त्याला कोणतरी कुटुंबाविरोधात भडकवत आहे, असं त्याने म्हटलंय.

आर्यने व्यक्त केली नाराजी

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आर्यने प्रतीकच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली. “मला वाटतं कोणीतरी त्याला कुटुंबाविरोधात केलं आहे. त्याला आमच्या कुटुंबातील कोणाच्याही संपर्कात राहायचं नाही. त्याने कोणाला फोन केला नाही,” असं आर्य म्हणाला. प्रतीकची सावत्र आई नादिरा बब्बर यांना न बोलवणं समजू शकतो, पण किमान त्याने वडील राज बब्बर यांना आमंत्रित करायला हवं होतं, असं आर्य म्हणाला. “आमचं आयुष्य हे चित्रपटापेक्षा कमी नाही, कोणाच्या तरी प्रभावामुळे तो असं करत आहे; कारण प्रतीक असा नाही,” असं आर्यने नमूद केलं.

प्रतीक हा राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. स्मिता पाटील या राज बब्बरच्या दुसऱ्या पत्नी होत्या, राज यांचे पहिले लग्न नादिरा बब्बरशी झाले होते. त्यांना आर्य बब्बर आणि जुही बब्बर अशी दोन अपत्ये आहेत. त्यानंतर राज बब्बर त्यांची को-स्टार स्मिता पाटीलच्या प्रेमात पडले आणि दोघांनी १९८३ मध्ये लग्न केले. १९८६ मध्ये या जोडप्याने त्यांचा मुलगा प्रतीकचे स्वागत केले, परंतु प्रतीकला जन्म दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच प्रसूतीशी संबंधित गुंतागुंतांमुळे स्मिता पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज बब्बर त्यांची पहिली पत्नी नादिराकडे परत गेले.

प्रतीकच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास त्याचं प्रिया बॅनर्जीबरोबर दुसरं लग्न आहे. त्याचं पहिलं लग्न सान्या सागरशी २०१९ मध्ये झालं होतं, पण ते नातं फार काळ टिकलं नाही. त्यांनी २०२३ मध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती. त्यानंतर प्रतीकच्या आयुष्यात प्रिया आली. प्रतीक व प्रिया या दोघांनी २०२३ च्या व्हॅलेंटाइन डे ला इन्स्टाग्रामवर नातं अधिकृत केलं होतं. त्यानंतर दोन वर्षांनी आता त्यांनी लग्न केलं आहे.

Story img Loader