स्मिता पाटील व राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर १४ फेब्रुवारी २०२४ रोजी लग्न बंधनात अडकला. त्याने गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी दुसरं लग्न केलं. लग्नात प्रतीकने वडील राज बब्बर व त्यांच्या कुटुंबाला बोलावलं नव्हतं. याबद्दल प्रतीकचा सावत्रभाऊ आर्य बब्बर याने नाराजी व्यक्त केली होती. प्रतीक कोणाच्या तरी प्रभावाखाली आहे, असं आर्यने म्हटलं होतं. आता प्रतीकने आडनाव हटवण्यामागचं आणि बब्बर कुटुंबाला लग्नात न बोलावण्यामागचं कारण सांगितलं आहे.

लग्नानंतर टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या दिलेल्या मुलाखतीत, प्रतीक आणि प्रिया यांनी या निर्णयामागील कारणांना खुलासा केला. लग्नाबद्दल सुरू असलेल्या या गोष्टींचा परिणाम झाला का? असं विचारल्यावर प्रिया म्हणाली, “आम्ही निवांत होतो. माझे कुटुंबीय कॅनडातून आले होते. माझे सर्वात जवळचे मित्र लग्नात होते. प्रतीकचे नातेवाईक होते, ज्यांनी त्याला वाढवलं होतं. आम्ही ज्यांच्यावर प्रेम करतो ते सगळे तिथे होते. त्यामुळे कोणी काही बोललं असेल तर त्याचा आम्हाला फरक पडला नाही आणि आम्ही त्यावर कमेंटही करणार नाही.”

लोक काय म्हणतात त्याने काहीही फरक पडत नाही, कारण मी खूप आनंदी होतो, असं प्रतीक म्हणाला. पूर्ण मुलाखतीत जेव्हा जेव्हा प्रतीकला त्याचे वडील आणि कुटुंबाबद्दल विचारण्या आलं तेव्हा प्रियाने हा विषय टाळायचा प्रयत्न केला. “ते कुटुंब त्याला गरज असताना कधीच जवळ नव्हते. ती व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधीच नव्हती. त्यामुळे, आता हा प्रश्न का उपस्थित होतोय हे मला माहीत नाही,” असं प्रिया म्हणाली. “आम्हाला आमचं आयुष्य जगायचं आहे. आमची बिलं कोणी भरत नाही,” असं प्रियाने स्पष्ट केलं.

योग्य वेळ आल्यावर बोलणार – प्रतीक

या सगळ्याबद्दल बोलण्याची वेळ येईल, तेव्हा बोलणार असल्याचं प्रतीक म्हणाला. प्रियाने प्रतीकला दोष देणाऱ्या लोकांना सुनावलं. “एक मूल जेव्हा आपल्या आईला गमावतं, तेव्हा ते कोणत्या परिस्थितीतून जातं, याची लोकांना कल्पना नाही,” असं प्रिया म्हणाली. “त्याच्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही. त्याने कधीही काहीच लपवलं नाही, मग तो त्याचा भूतकाळ असो किंवा वर्तमान असो,” असं प्रियाने सांगितलं.

प्रियामुळे प्रतीकने बब्बर कुटुंबाला लग्नात बोलावलं नाही, अशी शंका आर्य बब्बरने उपस्थित केली होती. त्यावर प्रियाने म्हटलं की तिला या गोष्टीचा फार त्रास होत नाही. पण अशा गोष्टी घडल्यावर लोक महिलेलाच दोष देतात. प्रतीक प्रियावरील आरोपांबद्दल म्हणाला, “या गोष्टीचा मला खरोखर खूप त्रास झाला.”

वडिलांचं ‘बब्बर’ आडनाव हटवून स्वत:ला प्रतीक स्मिता पाटील म्हणवण्यामागील कारणही प्रतीकने सांगितलं. नाव हटवण्याचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर किंवा करिअरवर कसा परिणाम होईल, याबद्दल प्रतीक म्हणाला की जे करतोय त्यामुळे त्याला बरं वाटतंय. “मला परिणामांची पर्वा नाही. हे नाव ऐकल्यावर मला कसं वाटतं ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मला पूर्णपणे माझ्या आईशी, तिच्या नावाशी आणि तिच्या वारशाशी जोडलेलं राहायचं आहे. मी माझ्या वडिलांसारखं नाही, तर माझ्या आईसारखं बनण्याचा प्रयत्न करतोय,” असं प्रतीकने नमूद केलं.

प्रतीकच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो शेवटचा ‘धूमधाम’ सिनेमात दिसला होता. हा चित्रपट त्याच्या लग्नाच्या दिवशी म्हणजेच व्हॅलेंटाइन डेला प्रदर्शित झाला. प्रतीक सलमान खानच्या ‘सिकंदर’मध्ये दिसणार आहे.