अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनापासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. चित्रपटाच्या गाण्यांना देखील चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटातील गाण्यांवर अनेकांनी रील्स पोस्ट केली होती. तर किली पॉल यानेही या चित्रपटातील एका गाण्यावर रील बनवलं.
किली पॉल हा टांझानियामधील सोशल मीडिया स्टार आहे. किली पॉल अनेक भारतीय गाण्यांवर रील बनवत असतो. आतापर्यंत त्याने अनेक बॉलीवूड गाण्यांवर रील्स बनवले आहेत. तर आता तो विकी कौशलच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटातील ‘तू है तो मुझे और क्या चाहिये’ या गाण्याच्या प्रेमात पडला आहे.
आणखी वाचा : Video: ठाण्यात येताच विकी कौशलने चाहत्यांशी मराठीतून दिलखुलासपणे साधला संवाद, म्हणाला…
किलीने नुकतंच त्याचं एक रील शेअर केलं. हे रील ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटातील ‘तू है तो मुझे और क्या चाहिये’ या गाण्याचं आहे. या गाण्यावर त्याने लिप्सिंग करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तर या वेळी त्याने पांढरा कुर्ता आणि त्यावर जॅकेट घातलं आहे. हे रील विकीने पाहिलं आणि त्याला ते खूप आवडलं. हे रील विकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत लिहिलं, “तुला खूप खूप प्रेम किली… आणि तुला हा कुर्ता आणि आणि हा पारंपरिक लूक खूप शोभून दिसत आहे.”
दरम्यान, विकी आणि साराच्या या नव्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गेले अनेक दिवस ही दोघं या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत होती. त्यामुळे पहिल्या दिवशी हा चित्रपट कशी कामगिरी करतोय याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.