बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानची बहीण व अभिनेत्री सोहा अली खान अभिनयासह सोशल मीडियावरही सक्रिय असते. अनेकदा ती सोशल मीडियामार्फत तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकतीच ती ‘छोरी २’ या चित्रपटाधून पून्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सोहाने तब्बल सात वर्षांनी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले आहे. परंतु, सध्या सोहा चर्चेत आहे ती एका वेगळ्याच कारणामुळे. सोहाने नुकतंच आंतरधर्मीय लग्न आणि हिंदू सण साजरे केल्यामुळे होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल वक्तव्य केलं आहे.
आंतरधर्मीय लग्न व त्यानंतर समाजातून मिळणाऱ्या प्रतिक्रियांवर वक्तव्य करताना सोहा म्हणाली, “मी हिंदू कुटुंबात लग्न केलं आहे. माझी आई हिंदू आहे. तिनं एका मुस्लीम माणसासह लग्न केलं होतं तेव्हा कायम लोकांनी माझ्या आईला तुझे पती तुला काम कसं करू देतात, असे प्रश्न विचारले; पण तिनं त्याकडे लक्ष न देता स्वत:च्या कामावर लक्ष केंद्रित केलं आणि आता जेव्हा मी दिवाळी किंवा होळी हे सण साजरे करते आणि त्याचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करते तेव्हा मलाही अनेक प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळतात. त्यावर अनेक जण मला तू रोझाही ठेवतेस का, तू नक्की मुस्लीम आहेस का, असे प्रश्न विचारतात. अर्थात, अशा कमेंट्सनी मला काही फरक पडत नाही; पण मी या कमेंट्स बघत असते. काही लोकांना इतरांबद्दल मागून बोलण्यात आनंद मिळतो”.
पतौडी कुटुंबामध्ये यापूर्वीही आंतरधर्मीय लग्नं झालेली आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर व मन्सूर अली खान यांचंही आंतरधर्मीय लग्न असून, अभिनेता सैफ अली खान व अभिनेत्री करीना कपूर खान यांनीही आंतरधर्मीय लग्न केलं आहे. त्यामुळे याबद्दल पुढे बोलताना सोहा म्हणाली की, आमच्या कुटुंबीयांबद्दल कायमच लोक अशा चर्चा करीत असतात, ज्याचा आम्हाला त्रास नाही होत; पण आम्ही अशा प्रतिक्रिया पाहत असतो.
दरम्यान, सोहा अली खान हिनं नुकतंच ‘छोरी २’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन केलं असून, हा चित्रपट ११ एप्रिलपासून अॅमेझॉन प्राइमवर प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाला आहे. या चित्रपटात सोहासह मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी, अभिनेत्री पल्लवी पाटील, ‘पंचायत’फेम अभिनेता जितेंद्र कुमार यांसारखे कलाकार पाहायला मिळत आहेत. तर, यापू्र्वी सोहा ‘साहेब बीवी और गँगस्टर रिटर्न्स’, ‘साहेब बीवी और गँस्टर ३’, ‘३१ ऑक्टोबर’, ‘दिल मांगे मोर’, ‘मुंबई मेरी जान’ या चित्रपटांमधून पाहायला मिळाली होती.