रोहित शेट्टीचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘सर्कस’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला, पण यातील काही दिग्गज कलाकारांमुळे हा चित्रपट सुसह्य ठरला त्यापैकी एक म्हणजे जॉनी लिवर. जॉनी लिवर या विनोदांच्या बादशाहने गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे, पण सध्या मात्र ते फारसे चित्रपटात दिसत नाहीत. याविषयीच त्यांनी खुलासा केला आहे.
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये भारतीय चित्रपटातील विनोदाचा घसरलेला दर्जा, उत्तम लेखकांची कमतरता आणि कॉमेडीकडे बघायचा कलाकारांचा दृष्टिकोन याविषयी जॉनी लिवर यांनी भाष्य केलं आहे. ‘इटाइम्स’शी संवाद साधताना ते म्हणाले, “मी स्वतः सध्या बऱ्याच भूमिकांना नकार देतो. तुम्ही बाजीगरचं उदाहरण घ्या, तर त्यात कोणताही कॉमेडी लेखक नव्हता, त्यातले सगळे पंचेस मीच काढले. ते दिवस खरंच खूप उत्तम होते. सध्याच्या काळात मात्र आपल्याकडे उत्तम कॉमेडी लेखकांची प्रचंड कमतरता आहे. जॉनीभाई सांभाळून घेतील असा विचार घेऊन बरेच लोक चित्रपट करतात, पण असं नाहीये, आम्हालासुद्धा तयारीसाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.”
आणखी वाचा : ‘मी वसंतराव’सुद्धा ऑस्कर २०२३ च्या शर्यतीत; राहुल देशपांडे यांनी पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
विनोदाचा घसरलेला दर्जा याबद्दल बोलताना ते म्हणतात, “आमच्या काळात कॉमेडीला एक सन्मान होता, आता चित्रपटात क्वचितच तुम्हाला कॉमेडी पाहायला मिळते. आधी जेव्हा मी चित्रपटात काम करायचो तेव्हा माझ्या सीन्सना लोकांचा एवढा उत्तम प्रतिसाद यायचा की काही नट भीतीपोटी माझे सीन्स एडिट करायला भाग पाडायचे. माझ्या विनोदाला मिळणारी दाद पाहून त्यांना आपण असुरक्षित असल्याची भावना मनात यायची. हळूहळू त्या मुख्य कलाकारांनाही कॉमेडी करायची इच्छा निर्माण झाली आणि मग लेखक ते सीन्स आमच्यात वाटून द्यायचे, यामुळेच नंतर माझ्या भूमिका आणखी छोट्या होत गेल्या, आणि आता कॉमेडी ही रसातळाला गेली आहे.”
इतकंच नही तर सध्या खूप कमी दिग्दर्शक आहेत जे विनोदाकडे फार गांभीर्याने पाहतात असंही जॉनी लिवर म्हणाले. यामध्ये त्यांनी रोहित शेट्टी या एकमेव दिग्दर्शकाचं नाव घेतलं. सध्याच्या चित्रपटात हीरो आणि व्हीलन्सच जास्त कॉमेडी असतात असंही त्यांनी या मुलाखतीमध्ये म्हंटलं आहे. ‘सर्कस’मध्ये जॉनी लिवर यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली.