Saif Ali Khan Attack Updates : सैफ अली खानवर वांद्रे येथील राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याने सध्या संपूर्ण बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. पूजा भट्ट, रवीना टंडन अशा अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत सेलिब्रिटींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मुंबई पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत असून या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, सैफच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.
शस्त्रक्रियेनंतर सैफची प्रकृती स्थिर असून अभिनेता या हल्ल्यात थोडक्यात बचावला अशी माहिती लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. सैफ आता बरा असून, तो वेळेत रुग्णालयात पोहोचला असंही डॉक्टरांनी सांगितलं. सैफवर हल्ला झाल्याची माहिती समोर आल्यावर सर्वत्र इब्राहिम अली खानने ( सैफ व अमृता सिंग यांचा मुलगा ) अभिनेत्याला रुग्णालयात दाखल केलं अशा चर्चा होत्या. मात्र, डॉक्टरांनी सैफ आपल्या लहान मुलाबरोबर रुग्णालयात आला असं स्पष्ट केलं आहे.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफला त्याचा ८ वर्षांचा मुलगा तैमूर अली खानने रुग्णालयात आणलं अशी माहिती लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. निरज उत्तमानी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. निरज उत्तमानी यांनी त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, “सैफ अली खानवर त्याच्या घरी एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. यानंतर त्याला पहाटे ३:०० वाजता त्याचा मुलगा तैमूर अली खान आणि त्याच्या केअरटेकरने रुग्णालयात आणलं.”
माध्यमांशी बोलताना डॉ. निरज उत्तमानी म्हणाले, “सैफ अली खान रुग्णालयात आला तेव्हा मी त्याला सर्वात आधी भेटलो. तो रक्तबंबाळ अवस्थेत होता, त्याचा लहान मुलगा तैमूरसह सैफ रुग्णालयात आला होता. सैफ अली खान हा खरा हिरो आहे. तो आता बरा आहे. त्याला आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. सैफला कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी त्याला जास्त लोकांना भेटण्याची परवानगी नाहीये.”