बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सोनाक्षी सिन्हा. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षीचा आज वाढदिवस आहे. २०१० साली तिने ‘दबंग’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. पण बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याचा तिचा प्रवास सोपा नव्हता. सिनेसृष्टीत पाऊल टाकण्याच्या आधी तिने तिचं तब्बल ३० किलो वजन कमी केलं. आज तिच्या वाढदिवशी तिची ही फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन जर्नी जाणून घेऊ या.
२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दबंग’ चित्रपटामध्ये सोनाक्षीने प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिच्या जोडीला अभिनेता सलमान खान प्रमुख भूमिकेत होता. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. पण सिनेसृष्टीत पाऊल टाकण्याच्या आधी तिला स्वतःच्या फिटनेसवर बरीच मेहनत घ्यावी लागली होती. सोनाक्षीने अगदी मोकळेपणाने आतापर्यंत वजन कमी करण्याच्या तिच्या या प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे.
बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या आधी तिचं वजन ९५ किलो होतं. पण सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तिने तिचं ३० किलो वजन कमी केलं. तिचा हा वजन कमी करण्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. सोनाक्षीने आतापर्यंत अनेकदा सांगितलं आहे की ती लहान असताना तिला तिच्या वजनावरून मित्रमैत्रिणी चिडवायचे. कारण सोनाक्षी लहानपणीपासूनच जास्त वजन असणाऱ्या मुलांपैकी एक होती. तिच्या किशोरवयीन काळात तिचं वजन झपाट्याने वाढू लागलं. वयाच्या १८ व्या वर्षी तिचं वजन ९५ किलो होतं. ती तिच्या वजनाबद्दल नाखूश होती आणि तिने स्वतःमध्ये बदल करायचं ठरवलं.
तिने तिच्या आहारात पूर्णपणे बदल केला. तिने बाहेरचं खाणं सोडलं, प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं सोडलं आणि ती अधिकाधिक फळं, भाज्या आणि कडधान्यं खाऊ लागली. याचबरोबर तिने नियमित व्यायाम करायलाही सुरुवात केली. वजन कमी करण्यासाठीचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. यासाठी तिला तिच्या लाइफस्टाइलमध्ये बराच बदल करावा लागला आणि अखेरीस सोनाक्षीने तिचं वजन ९५ किलोवरून ६५ किलो केलं.