अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या ‘दहाड’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. ‘दहाड’मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने महिला पोलीस अधिकारी ‘अंजली भाटी’ ही भूमिका साकारली आहे. या सीरिजच्या माध्यमातून सोनाक्षीने ओटीटीवर पदार्पण केले आहे. ‘दहाड’मधील सोनाक्षीच्या भूमिकेचे सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे. सोनाक्षीचे वडील अभिनेते शत्रुघ्न सिन्हा सध्या राजकारणात सक्रिय आहेत. वडिलांप्रमाणे राजकारणात जाण्याच्या मुद्द्यावर सोनाक्षीने खुलासा केला आहे.
हेही वाचा- Video : “आता तिसरी बायको…”; आमिर खान आणि फातिमा शेखचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून चर्चांना उधाण
एका मुलाखतीत सोनाक्षीला, तिच्या वडिलांप्रमाणे ती राजकारणात जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देत सोनाक्षी म्हणाली, “मला राजकारणात जायला आवडणार नाही. माझा राजकारणाकडे कल नाही. राजकारण क्षेत्राबाबत मला ज्ञान आहे. ज्ञान असणे ही वेगळी गोष्ट आहे. मी एक क्रिएटिव्ह व्यक्ती आहे आणि मला क्रिएटिव्ह क्षेत्रात जास्त रस आहे. माझ्या वडिलांनी आपले क्षेत्र बदलले म्हणून मीही त्यांच्याप्रमाणे माझे क्षेत्र बदलेन असे बिलकूल नाही. मला अजून खूप गोष्टी करायच्या आहेत. अलीकडे मी उद्योजकही झाले आहे. मी नुकताच नखांशी संबंधित ब्रँड सादर केला आहे.”
सोनाक्षी सिन्हाच्या ‘दहाड’ वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वेब सीरिजचे एकूण आठ भाग प्रदर्शित करण्यात आले आहेत. एका छोट्याशा शहरातील महिला पोलीस अधिकारी अंजली भाटीच्या अवतीभोवती या सीरिजची कथा आहे. सार्वजनिक शौचालयात एकामागून एक होणाऱ्या खुनांचा तपास अंजली भाटी करत असताना सीरियल किलर मात्र बिनधास्त फिरत असल्याचे तिच्या लक्षात येते. सुरुवातीला आत्महत्या वाटणाऱ्या या घटना सीरियल किलरच्या शिकार झाल्याचे समजताच अंजली या प्रकरणाचा छडा कसा लावते, हे या सीरिजमधून दाखविण्यात आले आहे.