Sonakshi Sinha Reacts to Pregnancy Rumours : बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोनाक्षीने याच वर्षी जून महिन्यात झहीर इक्बालबरोबर लग्न केलं. त्यानंतर आता ती गरोदर असल्याच्या चर्चा होत आहेत. या सर्व चर्चांवर अभिनेत्रीने तिची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच तिने गरोदर असल्याच्या अफवा पसरवणाऱ्या नेटकऱ्यांना वेडं म्हटलं आहे.
सोनाक्षी आणि झहीर इक्बाल या दोघांनी नुकतीच एका मुलाखतीमध्ये या अफवेवर प्रतिक्रिया दिली आहे. सोनाक्षीला लग्नानंतर अनेक ठिकाणी जेवणासाठी बोलावण्यात येत आहे. त्यावर ती म्हणाली, “हो, आम्हा दोघांना अनेक व्यक्ती, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी घरी जेवणासाठी बोलावत आहेत. त्यामुळे मला हे स्पष्ट करायचं आहे की, मी गरोदर नाही. फक्त मी थोडी जाड झाले आहे.”
हेही वाचा : “मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
पुढे गरोदर असल्याच्या अफवांवर तिनं प्रश्न विचारत म्हटलं, “आम्ही आमच्या लग्नाचा आनंद घेऊ शकत नाही का?” त्यावर तिचा पती झहीर हसत म्हणाला, “दुसऱ्याच दिवसापासून डाएट करण्यास सुरुवात.” पुढे सोनाक्षीनं हसत सांगितलं, “आम्ही सध्या फक्त स्वत:चं आयुष्य आनंदानं जगत आहोत. लग्नाला फक्त काही महिने झाले आहेत आणि अनेक व्यक्ती आम्हाला जेवणासाठी निमंत्रण देत आहेत. त्यामुळे आम्ही लोकांचं जेवण संपवण्यात व्यग्र आहोत.”
सोनाक्षी गरोदर असल्याच्या चर्चेवर झहीर इक्बालनं एक किस्सासुद्धा सांगितला. तो म्हणाला, “एकदा एक छोटा कुत्रा हातात घेऊन आम्ही एक फोटो काढला होता. तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर “सोनाक्षी गरोदर आहे”, असं काहींनी कॅप्शनमध्ये म्हटलं. आता या फोटोचा आणि गरोदर असण्याचा काही संबंध तरी आहे का?” त्यावर सोनाक्षीनं असं बोलणाऱ्या व्यक्ती वेड्या आहेत, असं म्हटलं.
गरोदर असल्याच्या अफवा कशा सुरू झाल्या?
सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर २८ ऑक्टोबरला एक फोटो पोस्ट केला होता. त्यामध्ये तिनं लाल रंगाचा ड्रेस आणि झहीरनं गडद निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या फोटोत सोनाक्षीच्या हातात एक कुत्रा होता. त्यावर अनेकांनी कमेंट्समध्ये थेट तिला गरोदर असल्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे पुढे सोशल मीडियावर ती गरोदर असल्याच्या चर्चा वाढत गेल्या.
हेही वाचा : कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
सोनाक्षी आणि झहीर एकमेकांना बरेच वर्षे डेट करीत होते. २३ जून २०२४ ला त्यांनी मुंबईत नोंदणी पद्धतीनं लग्न केलं. त्यानंतर त्यांनी सर्वांना रिसेप्शन पार्टी दिली होती. त्यांच्या या पार्टीला कुटुंबातील व्यक्तींसह बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.