Sonakshi Sinha Reply to Mukesh Khanna : सोनाक्षी सिन्हाला पाच वर्षांपूर्वी रामायणसंदर्भातील एका प्रश्नाचं उत्तर देता आलं नव्हतं, त्यावरून नुकतीच ‘शक्तीमान’ फेम मुकेश खन्ना यांनी टीका केली. खन्ना यांनी सोनाक्षीला उत्तर न येणं ही तिची नाही तर तिचे वडील शत्रुघ्न सिन्हांची चूक असल्याचं म्हटलं. आता सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर मोठी पोस्ट करून मुकेश खन्ना यांना उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माणूस बऱ्याच गोष्टी विसरतो, मलाही त्यावेळी उत्तर आठवलं नव्हतं. पण त्या गोष्टीबद्दल पुन्हा पुन्हा बोलून प्रसिद्धी मिळवणं बंद करा, असं सोनाक्षीने म्हटलं आहे.

मुकेश खन्ना यांनी काय म्हटलं?

‘शक्तिमान’ या पात्राचे महत्त्व सांगत सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना म्हणाले, “आजकालच्या मुलांना गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड या गोष्टीत रस आहे. हा सगळा इंटरनेटचा परिणाम आहे. काही वर्षांनी या मुलांना त्यांच्या आजी-आजोबांची नावं आठवणार नाहीत. हनुमानाने संजीवनी बुटी कोणासाठी आणली होती, तेही एका मुलीला माहीत नव्हतं.”

हेही वाचा – दिसण्याबद्दल विनोद करणाऱ्या कपिल शर्माला ॲटली कुमारने दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाला, “मी कसा दिसतो…”

सिद्धार्थने ही मुलगी म्हणजे सोनाक्षी सिन्हा आहे का, असं विचारलं. त्यावर मुकेश खन्ना हो म्हणाले. “हे त्या मुलीवर योग्य संस्कार न झाल्याने झालं. तिच्या वडिलांचं नाव शत्रुघ्न सिन्हा आहे, तिच्या भावांची नावं लव आणि कुश आहेत तरी तिला रामायणाबद्दल माहिती नाही. पण माझ्या मते यात तिची चूक नाही, तिच्या वडिलांची चूक आहे. त्यांनी मुलांना याबद्दल का शिकवलं नाही? ते इतके आधुनिक का झाले?” असं त्यांनी म्हटलं होतं.

सोनाक्षी सिन्हाने दिलं सडेतोड उत्तर

सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, “प्रिय सर, मुकेश खन्ना जी… मी तुम्ही नुकतंच केलेलं वक्तव्य वाचलं. खूप वर्षांपूर्वी मी एका कार्यक्रमात रामायणसंदर्भातील प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकले नाही, ही माझी नव्हे तर माझ्या वडिलांची चूक आहे, असं तुम्ही म्हणालात. मी तुम्हाला आठवण करून देते की त्या दिवशी हॉट सीटवर दोन महिला होता, ज्यांना त्याच प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हते, पण तुम्ही फक्त माझे नाव घेता, त्याचं कारणही स्पष्ट आहे.”

हेही वाचा – एसीमुळे बोकड शिंकलं, त्याच्या छातीला बाम लावला अन्…; नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा, म्हणाले, “पुण्यात येऊन…”

पुढे सोनाक्षीने लिहिलं, “होय, त्या दिवशी कदाचित मी उत्तर देऊ शकले नाही. विसरणं ही मानवी वृत्ती आहे आणि संजीवनी बुटी कोणासाठी आणली होती, ते मी विसरले. प्रभू श्रीराम यांनी माफ करण्याचे आणि विसरून जाण्याचे काही धडे शिकवले जे तुम्ही विसरल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे. प्रभू श्रीराम जर मंथराला माफ करू शकतात, कैकेयीला माफ करू शकतात आणि युद्ध झाल्यानंतर रावणालाही माफ करू शकत असतील तर तुम्हीही ही अत्यंत छोटी गोष्ट विसरू शकता.”

सोनाक्षी सिन्हाने मुकेश खन्ना यांना पोस्टमधून दिलं उत्तर (फोटो – स्क्रीनशॉट)

पुढे सोनाक्षी म्हणाली, “खरं तर मला तुमच्या माफीची गरज आहे असं नाही. पण माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या नावाने बातम्यांमध्ये पुन्हा पुन्हा येण्यासाठी तुम्ही ते विसरावं आणि तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणं थांबवावं, असं मला वाटतं. यापुढे तुम्ही माझ्या वडिलांनी माझ्यावर केलेल्या संस्कारांबद्दल काहीही बोलाल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही माझ्या संगोपनाबद्दल असं घाणेरडं वक्तव्य केलं, तरीही त्यांच्याच संस्कारांमुळे मी आज जे बोलले ते आदराने बोलले आहे.”

झाकीर हुसैन यांचे पूर्ण नाव काय होते, त्यांची पत्नी आणि मुली काय करतात? जाणून घ्या

सोनाक्षीला उत्तर न आलेला प्रश्न नेमका काय?

सोनाक्षीने २०१९ मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये हजेरी लावली होती. शोमध्ये तिला ‘हनुमानाने संजीवनी बुटी कुणासाठी आणली होती?’ असा प्रश्न विचारला. त्याचे चार पर्याय सुग्रीव, लक्ष्मण, सीता आणि राम हे होते. सोनाक्षीला उत्तर आलं नाही, त्यामुळे तिने लाइफलाइन वापरली होती. शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनीही सोनाक्षीला वडिलांचे नाव शत्रुघ्न व घराचे नाव रामायण असून उत्तर माहीत नाही, असं म्हटलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonakshi sinha reply to mukesh khanna comment on her upbringing by shatrughan sinha hrc