बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा काही दिवसांपासून आपल्या खासगी आयुष्यामुळे मोठ्या चर्चेत आहे. तिने नुकतीच झहीर इक्बालबरोबर लग्नगाठ बांधली असून, तिने केलेल्या आंतरधर्मीय विवाहामुळे तिच्यावर खूप टीका करण्यात येत होती. आता सोनाक्षीने एका मुलाखतीदरम्यान, तिने लग्नात तिच्या आईची साडी का नेसली होती, यावर खुलासा केला आहे.
काय म्हणाली अभिनेत्री?
सोनाक्षी याबद्दल बोलताना म्हणते की, माझ्या डोक्यात गोष्टी स्पष्ट होत्या. मला लग्नात आणि संगीत सोहळ्यात कोणते कपडे परिधान करायचे आहेत, हे मी आधीच ठरवले होते. मला माझ्या आईची साडी व तिचे दागिने घालायचे होते आणि मी तेच केले. रिसेप्शनच्या वेळी मला लाल रंगाची साडी नेसायची आहे, हेसुद्धा मी ठरवले होते. हे सगळं आधीपासूनच माझ्या डोक्यात होते आणि त्या दिवशी फक्त मी ते प्रत्यक्षात आणले. पुढे बोलताना तिने म्हटले की, मला खरेच असे वाटते की, ती साधी नवरी कुठेतरी मागे राहत आहे. मी परिधान केलेल्या कपड्यांमध्ये मला श्वास घेता येत होता. मी इकडे-तिकडे फिरू शकत होते आणि त्यामुळे मी माझ्या लग्नाचा आनंद घेऊ शकले. मला कोणत्याही गोष्टींचा त्रास झाला नाही. साधी; पण खूप सुंदर नवरी हा ट्रेंड आगामी काळात येणार असल्याचे सोनाक्षीने यावेळी म्हटले आहे.
झहीरच्या कपड्यांबद्दल बोलताना तिने म्हटले आहे की, आम्ही त्याच्या एका मित्राकडे गेलो, जो डिझायनर आहे. झहीरने एक ड्रेस बघितला, त्याला तो आवडला आणि त्याने तिथेच ठरवले की हेच कपडे मी लग्नात परिधान करणार आहे. आम्ही कपड्यांबाबत फार विचार नाही केला. ते निवडण्यात वेळ घालवला नाही.अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या इंडिया काउचर वीकला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात रँप वॉक करीत तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
दरम्यान, सोनाक्षी आणि झहीरने लग्न करण्याचे घोषित केल्यापासून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. अभिनेत्रीचे वडील व दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यावरदेखील टीका करण्यात येत होती. मात्र, आपण मुलीच्या आनंदात कायम तिच्यासोबत असू. तिने आंतरधर्मीय लग्न करून कोणताही कायदा मोडलेला नाही किंवा असंविधानिक काम केलेले नाही, असे त्यांनी म्हटले होते.
सोनाक्षीच्या कामाबद्दल बोलायचे, तर ती सध्या ‘काकुडा’ चित्रपटात दिसत आहे.