अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे मोठ्या चर्चेत होती. झहीर इक्बालबरोबर केलेल्या आंतरधर्मीय लग्नामुळे तिला अनेकांनी ट्रोलदेखील केले होते. आता मात्र सोनाक्षीने चित्रपटातील कामाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांचा भाग बनली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोनाक्षी ‘काकुडा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘काकुडा’ हा विनोदी भयपट आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेत्रीने म्हटले आहे की, मला भयपट आवडत नाहीत, पण या चित्रपटात विनोददेखील आहे. जेव्हा या चित्रपटासाठी मला विचारण्यात आले, तेव्हा मी याची गोष्ट वाचली. महत्त्वाचे म्हणजे स्क्रिप्ट वाचताना मला फार मजा आली. चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार याला बरोबर माहीत आहे, प्रेक्षकांना कधी भीती दाखवायची आहे आणि कधी त्यांना हसवायचे आहे. त्याची या प्रकारातील जाण उत्तम आहे. अशा जाणकार दिग्दर्शकासोबत हॉरर कॉमेडी चित्रपटात पहिल्यांदाच काम करताना खूप आनंद झाला. या चित्रपटामुळे मी माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडू शकले. अशा चित्रपटात काम करणे मला पुन्हा आवडेल, कारण या चित्रपटाचे शूटिंग करताना फार मजा आली, असे सोनाक्षी सिन्हाने म्हटले आहे.

सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्राम

पुढे या चित्रपटाबद्दल बोलताना तिने म्हटले आहे की, मला चित्रपटाची कथा आवडली होती, त्यामुळे मी ‘काकुडा’ हा चित्रपट लगेच साइन केला. मला एखादी गोष्ट आवडली असली तर ती करण्यात वेळ लावत नाही. समोरच्या व्यक्तीला वाट बघायला लावणे यावर मी विश्वास ठेवत नाही.

चित्रपटांबाबत ती म्हणाली की, मला अशी अभिनेत्री व्हायचे आहे की, जिला कोणत्याही भूमिकेत सहज कास्ट करता येईल. आज मी कोणताही छोटा- मोठा चित्रपट, ॲक्शन चित्रपट, रोमँटिक चित्रपट, कोणत्याही प्रकारचा चित्रपट करण्यास तयार आहे. याआधी मी वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटात काम केले असून मला त्याचा आनंद आहे.

हेही वाचा : Video : आली लग्नघटिका समीप! अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट आलिशान गाडीने बीकेसीच्या दिशेने मार्गस्थ

चांगल्या कथाकथनासाठी आणि तिच्यासारख्या कलाकारांसाठी त्यांची प्रतिभा सिद्ध करण्यासाठी ओटीटी सुरक्षित माध्यम आहे का? असे विचारले असता सोनाक्षी म्हणाली, “नाटकांमध्येही चांगल्या कथा आहेत. अर्थात, ‘हीरामंडी’सारखी गोष्ट चित्रपटगृहात येऊ शकत नाही, कारण त्याचे लांबलचक स्वरूप आहे. ओटीटीमुळे अनेक कलाकारांना संधी मिळत आहे. जेव्हा जेव्हा मी अशा प्लॅटफॉर्मसाठी काम केले आहे, त्या त्या वेळी चांगला अनुभव आला असल्याने मी ओटीटीची चाहती आहे. मी अभिनेत्री आहे, तुम्ही मला टीव्ही किंवा नाटकाचे काम दिले तरी मी ते कऱणार आहे, कारण ते माझे काम आहे.

मुख्य प्रवाहात काम मिळणे हे अभिनेत्रींसाठी कठीण आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणते, हे तर चांगलेच आहे. मला मोठ्या आणि महत्त्वाच्या भूमिका करायला आवडतात. ‘अकिरा’ चित्रपटात मी मुख्य भूमिकेमध्ये होते. मला चित्रपटातल्या दोन गाणी, चार सीनसाठी परत जायचे नाही. आत्ता जे मी करत आहे, त्याचा सध्या मी आनंद घेत आहे.

आता ‘मुंज्या’ चित्रपटाला भरघोस यश मिळाल्यानंतर ‘झी५’ वर प्रदर्शित झालेल्या ‘काकुडा’ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. यामध्ये तिच्यासोबत रितेश देशमुखदेखील अभिनय करताना दिसत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonakshi sinha said never want to go back to doing two songs and four scenes in a film nsp