Sonakshi Sinha Zahir Iqbal : शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी व बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने गेल्या वर्षी झहीर इक्बालशी आंतरधर्मीय लग्न केलं. या जोडप्याच्या लग्नाची तारीख जाहीर झाल्यावर बराच गदारोळ झाला होता. सोनाक्षीच्या कुटुंबाचा या नात्याला विरोध होता. त्यामुळेच लव आणि कुश सिन्हा हे तिचे दोन्ही भाऊ लग्नाला आले नव्हते, असं म्हटलं गेलं. शत्रुघ्न सिन्हांनी देखील सोनाक्षीच्या लग्नाबद्दल माहीत नसल्याचं आधी म्हटलं होतं, पण नंतर ते तिच्या लग्नाला उपस्थित राहिले होते. आजकालची मुलं आई-वडिलांना विचारत नाहीत तर निर्णय सांगतात, असं ते म्हणाले होते. सोनाक्षी व झहीर यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं, पण लग्नानंतर तिने धर्म बदलल्याची बातमी समोर आल्याने अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली. आता सोनाक्षी स्वतःच यावर उत्तर दिलं आहे.

सोनाक्षी सिन्हाने नुकतीच हॉटरफ्लायला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या व जहीरच्या धर्माबद्दल भाष्य केलं. “आम्ही कधीही धर्माबद्दल चर्चा केली नाही. आम्ही एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतो आणि समजून घेतो. झहीर त्याच्या परंपरांचे पालन करतो आणि मी माझ्या घरातील परंपरांचे पालन करते. झहीर दिवाळीच्या पूजेला बसतो,” असं सोनाक्षी म्हणाली.

धर्मांतराबाबतच्या प्रश्नावर सोनाक्षी म्हणाली…

सोनाक्षी सिन्हा पुढे म्हणाली, “आंतरधर्मीय लग्न करण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे स्पेशल मॅरेज ॲक्ट आहे. या कायद्यानुसार हिंदू महिलेला धर्म बदलण्याची गरज नाही आणि मुस्लीम पुरुषाला मुस्लीम राहण्याचा अधिकार आहे.” या कायद्यामुळे धर्म न बदलता एकमेकांवर प्रेम असणारे लोक एक सुंदर नात्यात राहू शकतात, असंही तिने नमूद केलं. ती धर्मांतर करणार आहे का? असा प्रश्न कोणी कधीच विचारला नाही का, याबद्दल सोनाक्षी म्हणायची की तिचं व झहीरचं एकमेकांवर प्रेम आहे आणि त्यांना लग्न करायचं आहे.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी २३ जून २०२४ रोजी लग्न केलं. दोघांची पहिली भेट २०१७ मध्ये सलमान खानच्या पार्टीत झाली आणि ते एकमेकांना डेट करू लागले. प्रेमात पडल्यानंतरही त्यांनी कधीच त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे कबुली दिली नाही, पण ते बरेचदा एकत्र कार्यक्रमांना जायचे व फिरायलाही जायचे, त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चा होत्या. अखेर दोघांनी सर्वांना लग्नाची माहिती देऊन आश्चर्याचा धक्का दिला होता. सोनाक्षी व झहीर यांनी ‘डबल एक्सएल’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

सोनाक्षी सिन्हाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती शेवटची ‘काकुडा’ चित्रपटात दिसली होती. यामध्ये ती रितेश देशमुख आणि साकिब सलीम महत्त्वाच्या भूमिकेत होते. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म झी 5 वर रिलीज करण्यात आला होता. ती लवकरच ‘निकिता रॉय अँड द बुक ऑफ डार्कनेस’ मध्ये परेश रावल आणि सुहेल नय्यरबरोबर दिसणार आहे.

Story img Loader