बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांना ती तिच्या आयुष्यातील अनेक अपडेट्स देत असते. अशात आता सोनाक्षी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे तिने मुंबईतील तिचं एक घर विकलं आहे. सोनाक्षीने हे घर विकून तब्बल ६१ टक्के इतका नफा कमवला आहे, त्यामुळे सध्या सर्वत्र तिचीच चर्चा सुरू आहे.
स्क्वेअर यार्ड्सने सोनाक्षीच्या खासगी मालमत्तेबद्दल सोमवारी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. यातील माहितीनुसार, सोनाक्षीने तब्बल २२.५० कोटी रुपयांना तिचं घर विकलं आहे. हे घर वांद्रे पश्चिम एमजे शाह ग्रुप ८१ ऑरिएट भागात होतं. या परिसरात सुनील शेट्टी, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण अशा काही मोठ्या कलाकारांचीही घरं आहेत.
एमजे शाह ग्रुप ८१ ऑरिएट हा प्रोजेक्ट तब्बल ४.४८ एकरमध्ये पसरलेला आहे. यामध्ये अनेक ४ बीएचके घरं आहेत. सोनाक्षीने विकलेल्या घराचा कार्पेट एरिया ३९१.२ वर्ग मीटर (साधारण ४,२११ वर्ग फूट) आणि बांधकाम असलेला परिसर ४३०.३२ वर्ग मीटर (जवळपास ४,६३२ वर्ग फूट) इतका आहे. यामध्ये तीन कार पार्किंगची सुविधाही आहे. या व्यवहारात ३०,००० रुपये नोंदणी शुल्क आणि १.३५ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागले आहे.
घर खरेदी केव्हा केलं होतं?
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने २०२० मध्ये हे घर खरेदी केलं होतं. त्यावेळी खरेदीसाठी तिने १४ कोटी रुपये दिले होती. आता हेच घर तिने २२.५० कोटी रुपयांना विकलं आहे. म्हणजे यातून तिने ५० टक्क्यांहून जास्त तब्बल ६१ टक्के नफा कमवला आहे.
सोनाक्षी आणि तिच्या पतीची एकूण मालमत्ता किती?
सोनाक्षीने ज्या प्रोजेक्टमधील घर विकलं आहे, तिथे तिचं आणखी एक प्रशस्त घर आहे. ते घर तिने २०२३ मध्ये ११ कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. जीक्यूवर असलेल्या माहितीनुसार, सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती झहीर इक्बाल या दोघांची मिळून सध्या त्यांच्याकडे १०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. यात महागड्या घरांसह त्यांच्याकडे १.४२ कोटी रुपयांची मर्सिडीज बेंझ (S350) आहे. तसेच ८७.७६ लाख रुपये किमतीची मर्सिडीज बेंझ (GLS 350d) आहे. ७५.९० लाख रुपयांची BMW ६ GT देखील आहे.
सोनाक्षीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, २०१० साली आलेल्या ‘दबंग’ या चित्रपटातून तिने पहिल्यांदा सिनेविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ‘रावडी राठोड’, ‘जोकर’, ‘ओ माय गॉड’, ‘सन ऑफ सरदार’, ‘दबंग २’, ‘हिंमतवाला’, ‘तेवर’ अशा अनेक चित्रपटांत तिने काम केले आहे.