बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘डबल एक्सएल’ या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. स्थूलत्व आणि त्यामुळे महिलांना सातत्याने हिणवलं जाणं या विषयावर आधारलेल्या या चित्रपटात सोनाक्षीनं साकारलेली भूमिका तिच्या खऱ्या आयुष्याशीही तेवढाच मेळ खाणारी आहे. एकेकाळी सोनाक्षीचं वजन एवढं वाढलं होतं की, तिला तिच्या स्वतःच्या घरातही यावरून ऐकून घ्यावं लागायचं. आईच वाढलेल्या वजनावरून सातत्याने बोलायची असं एका मुलाखतीत सोनाक्षीने सांगितलं आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षी सिन्हाने बॉडी शेमिंगच्या अनुभवावर भाष्य केलं. बॉडी शेमिंगची सुरुवात आपल्याच घरापासून होते असं सोनाक्षीचं मत आहे. सोनाक्षी म्हणाली, “मी लहान असताना माझी आई सातत्याने मला वजन कमी करण्यास सांगत असे. अर्थात यात तिची चूक होती असं म्हणता येणार नाही कारण तिच्यावरही आधी नातेवाईक आणि नंतर समाजाचं प्रेशर होतं. त्यामुळे ती मला अशाप्रकारे बोलत असावी.”

आणखी वाचा- “खरं सांगायचं तर…” अपूर्वा नेमळेकरच्या ‘बिग बॉस मराठी’मधील खेळाबद्दल ‘अण्णा नाईक’ थेट बोलले

सोनाक्षी पुढे म्हणाली, “मी दोन महिन्यात १५ किलो वजन वाढवलं होतं. जे जे पदार्थ खायला मला आवडायचे ते सर्व पदार्थ मी या काळात खाल्ले. अर्थात मी अनहेल्दी पद्धतीने हे वजन वाढवलं हे मान्य करते. माझ्याकडे या चित्रपटासाठी खूप कमी वेळ होता आणि मला कमी काळात जास्त वजन वाढवायचं होतं. माझं वजन सामान्यपणे नेहमीच खूप पटकन वाढतं त्यामुळे त्यासाठी मला फार काही करावं लागलं नाही. वजन वाढवणं किंवा कमी करणं आमच्या प्रोफेशनचा भाग आहे पण त्यामुळे बॉडी शेम केलं जातं हे फार चुकीचं आहे.”

Story img Loader