बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व अभिनेता झहीर इक्बाल २३ जून रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाला अवघे सहा दिवस उरले आहेत. याच दरम्यान सोनाक्षी सिन्हाने झहीरच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. झहीरच्या बहिणीने इन्स्टाग्रामवर एक सुंदर फॅमिली फोटो शेअर केला आहे, त्यात सोनाक्षी सिन्हादेखील आहे.
लवकरच लग्नबंधनात अडकणारी सोनाक्षी सिन्हा हिने तिचा रविवार तिच्या होणाऱ्या सासरच्या मंडळींबरोबर घालवला. २३ जून रोजी सोनाक्षी व झहीरचं लग्न होणार आहे, त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे, अशातच झहीरची बहीण आणि सेलिब्रिटी स्टायलिस्ट सनम रतन्सीने इन्स्टाग्रामवर एक फोटो छान फोटो शेअर केला आहे. ‘हीरामंडी’ फेम सोनाक्षी तिचे होणारे सासरे, सासू आणि नणंदेबरोबर पोज देताना दिसली. दुसरीकडे झहीर, त्याची आई आणि बहिणीच्या मध्ये उभा होता. तर सोनाक्षी होणाऱ्या सासऱ्यांच्या शेजारी उभी होती. सनमने हार्ट इमोजीसह शेअर केलेला हा फोटो चांगलाच चर्चेत आहे.
कोण आहे सनम रतन्सी?
सनम ही झहीरची बहीण असून ती एक सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे, तिने अलीकडेच सोनाक्षी सिन्हासह ‘हीरामंडी’ च्या अनेक कलाकारांसाठी काम केलं होतं.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांची संपत्ती किती? दोघांपैकी श्रीमंत कोण? जाणून घ्या
झहीरचे कुटुंबीय काय करतात?
झहीरचे वडील इक्बाल हे ज्वेलर आणि बिझनेसमन आहेत. हे कुटुंबीय सलमान खानच्या खूप जवळचे आहेत. झहीरची आई गृहिणी आहे. त्याची बहीण स्टायलिस्ट आहे, तर झहीरला एक लहान भाऊ आहे जो कॉम्प्युटर इंजिनिअर म्हणून काम करतो.
सोनाक्षी व झहीरच्या लग्नाची हटके पत्रिका
सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाची पत्रिका एका मॅगझीन कव्हरसारखी आहे. यातएक ऑडिओ क्यूआर कोड देण्यात आला आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर सोनाक्षी आणि झहीरचा इन्व्हिटेशन मेसेज ऐकू येतो. या ऑडिओ मेसेजच्या सुरुवातीला हे दोघे म्हणतात, “आमच्या सर्व, टेक सॅव्ही व गुप्तहेर मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांना हाय!” झहीर पुढे म्हणतो, “गेल्या सात वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत. आनंद, प्रेम, एकमेकांसोबत हसणं या सगळ्या गोष्टींना आम्हाला या क्षणापर्यंत आणलं आहे.”
सोनाक्षी पुढे म्हणते, “तो क्षण जेव्हा आम्ही एकमेकांच्या कथित गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या पलीकडे जाऊन पुढचं पाऊल उचलतोय.” झहीर म्हणतो, “एकमेकांचे अधिकृत पती-पत्नी बनण्यासाठी.” यानंतर दोघे एकत्र म्हणतात, “तर तुमच्याशिवाय हे सेलिब्रेशन पूर्ण होणार नाही, म्हणून २३ जूनला तुम्ही जे काही करत आहात ते सोडून आमच्याबरोबर पार्टी करा.”