शत्रुघ्न सिन्हा यांची लेक अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने जून २०२४ मध्ये बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न केलं. सात वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली. सोनाक्षी व झहीर यांचे लग्न खूप खासगी होते. या लग्नात दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. सोनाक्षीच्या आंतरधर्मीय लग्नात तिचे आई-वडील उपस्थित होते; मात्र भाऊ, लव आणि कुश यांनी या लग्नात येणं टाळलं होतं. ते दोघेही लग्न व रिसेप्शनमध्ये न आल्याने या भावंडांमध्ये तणाव असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आता सोनाक्षीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षीने तिचे थोरले जुळे भाऊ लव व कुश यांच्याबरोबर तिचं नातं कसं आहे ते सांगितलं. त्या दोघांनाही आपला हेवा वाटतो आणि लहान असताना ते मारायचे, असं सोनाक्षी या मुलाखतीत म्हणाली.
“मी घरातील सर्वात लहान, घरातील एकमेव मुलगी, सर्वांची लाडकी होते. त्यामुळे माझे भाऊ माझा हेवा करायचे आणि मला मारायचे,” असं सोनाक्षीने सांगितलं.
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात भाऊ अनुपस्थित होते, त्यासंदर्भात शत्रुघ्न सिन्हा यांना विचारण्यात आलं होतं. “खरं तर मी तक्रार करणार नाही. कदाचित ते अजूनही इतके परिपक्व नसतील. मला त्यांचा त्रास आणि गोंधळ समजतोय. अशा लग्नांबद्दल नेहमीच एक सांस्कृतिक प्रतिक्रिया असते. कदाचित, मी त्यांच्या वयाचा असतो, तर मीही अशीच प्रतिक्रिया दिली असती. पण, इथे तुमची परिपक्वता, ज्येष्ठता आणि अनुभव कामी येतो. त्यामुळे माझी प्रतिक्रिया माझ्या मुलांइतकी टोकाची नव्हती,” असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते.
लव सिन्हाने सोनाक्षीच्या लग्नाला उपस्थित नसल्याच्या वृत्तावर इन्स्टाग्रामवर प्रतिक्रिया दिली होती. “मी लग्नात अनुपस्थित राहण्याचा निर्णय का घेतला? खोट्या गोष्टींच्या आधारे माझ्याविरुद्ध ऑनलाइन मोहीम चालवल्याने माझ्यासाठी माझे कुटुंब नेहमीच सर्वात आधी असेल हे सत्य बदलणार नाही,” असं लव म्हणाला होता.
सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल जून २०२४ मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांनी नोंदणी पद्धतीने सोनाक्षीच्या वांद्रे येथील घरात लग्न केलं. या लग्नाला दोघांचे कुटुंबीय व मोजकेच मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. सोनाक्षीच्या लग्नात हुमा कुरेशी भाऊ साकीब सलीमने भावाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या.