‘परिंदा’, ’12th फेल’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे विधू विनोद चोप्रा आपल्या हटके चित्रपटांसाठी ओळखले जातात. आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत एकदा त्यांच्यामध्ये वाद झाला होता, अशी आठवण सांगितली आहे.
काय म्हणाली सोनाली कुलकर्णी?
विधू विनोद चोप्रा यांच्या २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘मिशन काश्मीर’ या चित्रपटात हृतिक रोशन, संजय दत्त, प्रीती झिंटा यांच्याबरोबर सोनाली कुलकर्णी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला आहे.
सोनाली कुलकर्णीने नुकतीच सिद्धार्थ कननच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत विधू विनोद चोप्रांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना तिने म्हटले, “एकदा ते माझ्यावर खूप ओरडले होते. ऑक्टोबरच्या महिन्यात आम्ही श्रीनगरमध्ये शूटिंग करत होतो, त्यावेळी नेहरू गेस्ट हाऊसमध्ये थांबलो होतो. कडाक्याची थंडी होती आणि मला तापसुद्धा आला होता. दोन दिवस त्यांनी माझ्याबरोबर एकसुद्धा सीन शूट केला नाही. त्यादरम्यान, एका मीटिंगमध्ये मी विधू विनोद चोप्रा यांना विचारलं, “तुम्ही मला घरी पाठवू शकता का?” ते मला म्हणाले, “तू वेडी आहेस का? तुला वाटतं का की मी इथून तुला परत पाठवेन.” मीसुद्धा त्यांच्यावर परत ओरडले आणि विचारले, “तुम्ही माझे सीन कधी शूट करणार आहात?”
पुढे अभिनेत्रीने म्हटले, “त्यावेळी मला भान नव्हते की मी विधू विनोद चोप्रांशी बोलत आहे. मी फक्त हा विचार केला की, जर माझे सीन आता शूट केले जाणार नसतील, त्यासाठी कोणती योजना नसेल तर मला आता परत जाऊदे आणि जेव्हा तुमचा प्लॅन तयार होईल तेव्हा मला परत बोलवा. मी तिकिटाचे पैसे आणि इतर गोष्टींचा जास्त विचार केला नाही. जेव्हा ते मला म्हणाले होते, तू वेडी आहेस का? त्यावेळी मी त्यांना म्हणाले होते की, मी वेडी नाहीये; मला माझ्या लाइन्स आणि भूमिका माहीत आहेत. हे ऐकल्यानंतर विधू विनोद चोप्रा यांनी कोणालातरी बोलावले आणि सांगितले की, तिला काहीतरी खायला द्या, तिला ताप आहे. त्यानंतर माझे सीन शूट केले गेले. त्यांना खूप लवकर राग यायचा”, असे सोनालीने म्हटले आहे.
विधू विनोद चोप्रा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, “मी खूप रागीट, हिंसक, गर्विष्ठ व्यक्ती होतो.”
हेही वाचा: “आणि आमचे सूर जुळले…”, अनुपम खेर यांनी सांगितला लग्नाचा किस्सा; म्हणाले…
दरम्यान, विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला ’12th फेल’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटात विक्रांत मेसी, मेधा शंकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.