बॉलीवूड असो किंवा हॉलिवूड, स्टारकिड्स आणि नेपोटीजम हा वाद नेहमीच चर्चेचा विषय असतो. आलिया भट्ट, जान्हवी कपूरपासून तेअर्जुन कपूरपर्यंत, जवळजवळ प्रत्येक बी-टाउन स्टारकिडला या विषयावर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. मात्र, बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर ही बऱ्याचदा या वादामुळे चर्चेत असते. नुकत्याच एका जुन्या व्हिडिओमुळे सोनम पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
या व्हिडिओमध्ये सोनम अभिनेता राजकुमार रावबरोबर नेपोटीजम आणि बाहेरून अभिनयाचं स्वप्न उराशी बाळगून येणारे कलाकार याबद्दल भाष्य करत आहे. सोनम कपूरने या मुलाखतीमध्ये एकाअर्थी नेपोटीजम हे कसं योग्य आहे हे पटवून द्यायचा प्रयत्न केला आहे आणि तिचा अनुभवही तिने यात शेअर केला आहे, यामुळे सध्या सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
याविषयी बोलताना सोनम म्हणाली, “मला जेव्हा या क्षेत्रात यायचं होतं तेव्हा मला संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर सहाय्यक म्हणून काम करायचं होतं, मी जेव्हा माझ्या वाडिलांना ही गोष्ट सांगितली कि तू आदित्य चोप्रा किंवा विधु विनोद चोप्राबरोबर काम कर यांना मी ओळखतो, संजय लीला भन्साळी यांना मी ओळखत नाही. त्यामुळे माझ्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणंसुद्धा तेवढंच कठीण होतं.” सोनमच्या बोलण्यात मध्येच थांबून राजकुमार रावने तिला एका आऊटसाईडरच्या भावनांची जाणीव करून दिली, तो म्हणाला, “हाच फरक आहे, तुला कोणाबरोबर काम करायचं आहे यासाठी तुझ्याकडे पर्याय होते, पण सामान्य घरातून येणाऱ्या व्यक्तीला इथे काम मिळण्यापासून धडपड करावी लागते. आमच्यासाठी तेच खूप कठीण असतं.”
हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर कॉमेंट करत सोनमला चांगलंच ट्रोल केलं आहे तर राजकुमार रावची पाठ थोपटली आहे. सोनम कपूर २०१९ मध्ये ‘झोया फॅक्टर’ या चित्रपटात झळकली होती, तर राजकुमार रावच्या आगामी ‘भीड’ या चित्रपटासाठी चाहते चांगलेच उत्सुक आहेत.