मुंबईतील चेंबुर परिसरात बॉलिवूड गायक सोनू निगमचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम संपतेवेळी सोनूवर हल्ला झाल्याचं वृत्त समोर आलं आहे आणि यात त्याच्या मित्राला दुखापत झाल्याचंही स्पष्ट झालं आहे. चेंबुरचे आमदार प्रकाश फेटरपेकर यांचा मुलगा स्वप्नील फेटरपेकर याने लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान सोनू आणि त्याच्या टीमबरोबर धक्काबुक्की केल्याचं स्पष्ट झालं आहे.
या प्रकरणाला प्रकाश यांनी फारसं महत्त्व दिलेलं नाही, त्यांच्यामते ही फार किरकोळ गोष्ट होती, पण जे घडलं ते चुकीचं असल्याचं त्यांचं मत आहे. यादरम्यानचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे. प्रकाश फेटरपेकर यांनी ‘टाइम्स नाऊ’शी संवाद साधताना म्हणाले, “माझ्या मुलाने सोनूवर हल्ला केलेला नाही. तुम्ही जर तो व्हिडीओ नीट पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की हे चुकून घडलं आहे, त्याने मुद्दाम हे केलेलं नाही. सोनू स्टेजवरून खाली उतरत असताना माझा मुलगा तेव्हा फक्त एक सेल्फी घ्यायचा प्रयत्न करत होता.”
आणखी वाचा : “त्यांच्या कर्माची फळं…” उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबद्दल कंगना रणौतचं मोठं वक्तव्य
एकंदरच ज्यापद्धतीने हे प्रकरण समोर आलं आहे त्याबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “जे घडलं ते चुकीचं आहे. माझा मुलगा अत्यंत नम्र आहे. त्याने याबद्दल माफी मागितली आहे, मी सुद्धा सोनू निगम यांची माफी मागितली आहे.” सोनूने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की, “आमदाराच्या मुलाने आम्हाला स्टेजवरून खाली उतरताना ढकललं. यामध्ये त्याचे सहकारी मित्र हरिप्रकाश आणि रब्बानी खान हे खाली पडले आणि त्यांना दुखापत झाली.”
सोनू निगमने दिलेल्या स्टेटमेंटनुसार मुंबई पोलीसांनी भारतीय दंड संहितेनुसार कलम ३२३, ३४१, ३३७ या कलमांतर्गत तक्रार दाखल केली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनीदेखील यावर प्रकाश टाकला आहे. एएनआयशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, “आमदाराच्या मुलाने कार्यक्रम संपल्यानंतर सोनूजवळ सेल्फीसाठी धाव घेतली, त्यावेळी सोनूच्या बॉडीगार्डने त्याला अडवलं. त्यानंतर त्यांच्यात आणि बॉडीगार्डमध्ये धक्काबुक्की झाल्यानेच काही लोक स्टेजवरून खाली उतरताना पडले आणि त्यांना दुखापत झाली.”